मुख्य सामग्री पर जाएँ

पुण्यातील दारूकांड दडपण्याचा प्रयत्न

हृदयविकाराचे खोटे कारण सांगून शासकीय यंत्रणेकडून दडपशाही; आमदार रोहित पवारांचा थेट पोलिसांवर खुनाचा गंभीर आरोप

पघ
प्रशिक घस्ते

2 मिनट पठन

पुण्यातील दारूकांड दडपण्याचा प्रयत्न

हृदयविकाराचे खोटे कारण सांगून शासकीय यंत्रणेकडून दडपशाही; आमदार रोहित पवारांचा थेट पोलिसांवर खुनाचा गंभीर आरोप

पुणे: पुण्यातील हडपसर भागातील विषारी व बनावट दारू दुर्घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलेले असतानाच आता या संपूर्ण प्रकरणात पोलीस आणि आरोग्य यंत्रणांनी मिळून मूळ माहिती दडपण्याचा आणि मृतांच्या कुटुंबियांची दिशाभूल करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित राजेंद्र पवार यांनी आज हडपसर परिसरातील विषारी दारूमुळे मृत्युमुखी पडलेल्या यशवंत पवार आणि अरुण वामन दादर यांच्या कुटुंबियांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वनपर भेट घेतली. या भेटीदरम्यान पीडित कुटुंबियांनी मांडलेली व्यथा अत्यंत संतापजनक असून, यशवंत पवार यांचा मृत्यू विषारी दारूच्या प्राशनामुळे झाला असतानाही निर्ढावलेल्या शासकीय आरोग्य आणि पोलीस यंत्रणेने त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने (हार्ट अटॅकने) झाल्याचे खोटे कारण सांगून मूळ गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

पोलीस आणि बनावट दारू माफियांची अभद्र युती
या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त करत, स्थानिक पोलीस आणि बनावट दारू माफियांची अभद्र युतीच या १८ निष्पाप नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा घणाघाती आरोप केला असून हे मृत्यू म्हणजे पोलीस यंत्रणेच्या छुपे पाठबळातून घडवून आणलेले थेट खूनच आहेत, अशी पीडित कुटुंबियांची भावना असल्याचे सांगत पोलीस खात्यावर थेट निशाणा साधला आहे.

पीडित कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतल्यानंतर आणि वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर आमदार रोहित पवार प्रचंड आक्रमक झाले असून त्यांनी या विषारी दारू अड्ड्यांविरुद्ध थेट मैदानात उतरण्याचा इशारा दिला आहे.

गुन्हेगारांचे वर्चस्व वाढले
पुण्यात आज गुन्हेगारांचे वर्चस्व वाढले असून, गुन्हे दाखल असलेल्या अट्टल गुन्हेगारांसोबत पोलीस अधिकारी पार्ट्या झोडत असल्याचे चित्र दिसत आहे, तर दुसरीकडे शहरातील कुप्रसिद्ध कोयता टोळीशी (कोयता गँगशी) पोलिसांचे अवैध संबंध उघड होत आहेत. इतकेच नव्हे तर दिवसाढवळ्या चक्क पोलिसांच्या वेशात दरोडेखोरी आणि लुटमार होत असल्यामुळे एकेकाळचे सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित असलेल्या पुण्याची वाटचाल आता गुन्हेगारांच्या शहराकडे होत आहे.

हे गंभीर संकट रोखण्यासाठी आणि प्रशासनाला जागे करण्यासाठी आज कार्यकर्त्यांच्या मदतीने हडपसर परिसरातील एक बनावट दारूचा अड्डा थेट फोडण्यात आला असून, शासनाने तात्काळ बेकायदेशीर दारू अड्ड्यांवर कारवाई न केल्यास आगामी काळात हाच ‘प्रहार पॅटर्न’ संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळेल, असा थेट इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.

शेयर करें