राजगुरूनगरमध्ये डॉक्टरांचे घर फोडले; २ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
अज्ञात चोरट्याने घराचे आणि बेडरूमचे कुलूप व कोयंडा तोडून प्रवेश केला
1 मिनट पठन

अज्ञात चोरट्याने घराचे आणि बेडरूमचे कुलूप व कोयंडा तोडून प्रवेश केला
पुणे: खेड तालुक्यातील राजगुरूनगर येथील करंडेवस्ती भागात एका डॉक्टरचे घर फोडून अज्ञात चोरट्याने २ लाख १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. बुधवारी (ता. २२) रात्री ११ ते गुरुवारी (ता. २३) पहाटे ५ च्या सुमारास हा प्रकार घडला असून, याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजगुरूनगर येथील वाडा रोडवरील करंडेवस्ती येथे राहणारे डॉक्टर शरद गुलाबराव धानोरे (वय ५०) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. बुधवारी रात्री डॉक्टर धानोरे आणि त्यांचे कुटुंबीय झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे आणि बेडरूमचे कुलूप व कोयंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉकर शिताफीने उघडून त्यातील मौल्यवान दागिने चोरून नेले.
चोरीला गेलेल्या ऐवजामध्ये ६० हजार रुपये किमतीची एक तोळा वजनाची जोधळ पोत, १ लाख २० हजार रुपये किमतीचा दोन तोळे वजनाचा सोन्याचा टिक्का आणि ३० हजार रुपयांची अर्धा तोळा वजनाची कानातील कर्णफुले, असा एकूण २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल आहे. सकाळी घरफोडी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर धानोरे यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.
खेड पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१ (४), ३३१ (३) आणि ३०५ (अ) नुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवाल्दार बिडकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. राजगुरूनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
Doctor's house broken into in Rajgurunagar; gold ornaments worth Rs 2 lakhs looted
