घनकचरा विभागाची 'दोन भागांत' विभागणी
कचरा संकलन व कचरा प्रक्रिया असे होणार दोन भाग
1 मिनट पठन

कचरा संकलन व कचरा प्रक्रिया असे होणार दोन भाग
निलेश राऊत
पुणे: घनकचरा व्यवस्थापनातील वादग्रस्त निर्णयांनंतर अखेर पालिका प्रशासनाने संरचनात्मक बदल करीत कचरा संकलन आणि कचरा प्रक्रिया अशा दोन स्वतंत्र गटांत विभागणी करण्यात आली आहे.

कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी पावले
आयुक्त नवल किशोर राम यांनी घनकचरा विभागाच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी पावले उचलली असून, गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी 'चेक पॉइंट' तयार करण्यात येत आहेत.
आयुक्तांच्या आदेशानुसार, परिमंडळ दोनचे उपायुक्त संतोष वारुळे यांच्याकडे कचरा संकलन विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, तर परिमंडळ तीन व निवडणूक विभागाचे उपायुक्त प्रसाद काटकर यांच्याकडे कचरा प्रक्रिया विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच घनकचरा विभागाच्या उपायुक्तपदी नियुक्ती झालेल्या अविनाश सपकाळ यांना परिमंडळ दोन आणि मागासवर्ग विभागाची जबाबदारी दिली आहे.
पूर्वीपासून नाराजी, आता थेट बदल
घनकचरा कामकाजावर विभागाच्या महापालिका आयुक्त सुरुवातीपासूनच नाराज होते. याआधी त्यांनी तत्कालीन उपायुक्त संदीप कदम यांची बदली करून अविनाश सपकाळ यांची नियुक्ती केली होती. मात्र, अपेक्षित सुधारणा न झाल्याने अखेर विभागाची रचना बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. नव्या आदेशानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ पदभार स्वीकारून कामकाज सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
Division of solid waste department into 'two parts'
