सायबर चोरटयांनी कोंढव्यातील ज्येष्ठ महिलेला ११ लाखांना लुबाडले
शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली आयपीओ गुंतवणुकीचे दाखवले आमिष
1 मिनट पठन

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली आयपीओ गुंतवणुकीचे दाखवले आमिष
पुणे: शेअर बाजार आणि आयपीओ (IPO) मध्ये गुंतवणूक करून भरघोस परतावा मिळवून देण्याच्या बहाण्याने कोंढवा परिसरातील एका ७५ वर्षीय ज्येष्ठ महिलेची सुमारे १० लाख ९६ हजार ७९० रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. सायबर चोरट्यांनी मोबाईल ॲप डाऊनलोड करण्यास सांगून जाळ्यात ओढले आणि महिलेच्या खात्यातील आयुष्यभराची पुंजी लंपास केली.

याप्रकरणी कोंढवा येथे राहणाऱ्या ७५ वर्षीय ज्येष्ठ महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मोबाईल धारक, ॲप धारक आणि ज्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा झाले, त्या खातेधारकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१९(२), ३१८(४), ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायदा कलम ६६(डी) नुसार गुन्हा नोंदवला आहे.
असा घातला गंडा
मिळालेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी फिर्यादी महिलेला मोबाईलवर संपर्क साधून आपण शेअर ट्रेडिंग तज्ज्ञ असल्याची बतावणी केली. “आमच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास तुम्हाला अल्पावधीत खूप चांगला परतावा मिळेल,” असे आमिष त्यांनी दाखवले. सुरुवातीला गोड बोलून आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांना एका विशिष्ट मोबाईल ॲपची लिंक पाठवून ते डाऊनलोड करण्यास भाग पाडले.
आयपीओच्या नावाखाली पैसे उकळले
ॲप डाऊनलोड केल्यानंतर आरोपींनी फिर्यादीला विविध कंपन्यांचे शेअर्स आणि आयपीओ खरेदी करण्यास सांगितले. अधिक नफा मिळवण्यासाठी पैसे ट्रान्सफर करणे आवश्यक असल्याचे सांगून चोरट्यांनी महिलेला वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण १० लाख ९६ हजार ७९० रुपये जमा करण्यास लावले. पैसे भरल्यानंतर काही दिवसांनी फिर्यादींनी आपला नफा काढण्याचा प्रयत्न केला असता, तो निघाला नाही. वारंवार विचारणा करूनही आरोपींकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले.
कोंढवा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
