Cyber Fraud : केवायसीच्या नावाखाली फसवणूक, पण सायबर पोलिसांची 'अशक्य' कामगिरी!
Mira Bhayandar Cyber Fraud News : गुन्हेगारांच्या हातात गेलेले 1 लाख 60 हजार रुपये न्यायालयाच्या मदतीने परत मिळवले
2 मिनट पठन

Mira Bhayandar Cyber Fraud News : गुन्हेगारांच्या हातात गेलेले 1 लाख 60 हजार रुपये न्यायालयाच्या मदतीने परत मिळवले
मीरा-भाईंदर :- सायबर गुन्हेगारांनी कितीही कठीण जाळे विणले तरी ते कितीही अशक्य असले तरी ते सोडवण्याची किमया मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलिसांनी पुन्हा एकदा करून दाखवली आहे. केवळ बनावट KYC अपडेटच्या बहाण्याने फसवणूक झालेल्या एका व्यक्तीचे 1 लाख 60 हजार रुपये पोलिसांनी परत मिळवून दिले आहेत. विशेष म्हणजे, ही रक्कम सायबर चोरांच्या खात्यात पोहोचल्यानंतरही पोलिसांनी ती यशस्वीरीत्या परत आणली. Mira Bhayandar Latest Cyber Crime News
हा प्रकार विरार हद्दीतील एका तक्रारदारासोबत घडला. त्यांच्या व्हॉट्सॲपवर एका अनोळखी नंबरवरून बँकेचा लोगो असलेला मेसेज आला. 'तुमचे खाते बंद झाले आहे, ते चालू ठेवण्यासाठी KYC अपडेट करा,' असे सांगत त्यांना एका बनावट बँक ॲपची लिंक पाठवण्यात आली. विश्वास ठेवून तक्रारदाराने त्या लिंकवर आपली सर्व गोपनीय बँक माहिती भरली आणि काही क्षणातच त्यांच्या खात्यातून 1.60 लाख रुपये काढले गेल्याचा मेसेज आला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने जराही वेळ न घालवता सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांची तत्परता आणि पोलिसांच्या वेगवान कार्यवाहीमुळेच ही रक्कम वाचवणे शक्य झाले. सायबर पोलिसांनी तातडीने NCCRP पोर्टलवर तक्रार नोंदवून ज्या बँक खात्यात पैसे गेले, ते खाते तात्काळ गोठवले.पैसा गुन्हेगारांच्या खात्यात पोहोचला असल्याने तो परत मिळवणे सोपे नव्हते. पण पोलिसांनी हार मानली नाही. त्यांनी तांत्रिक आणि कायदेशीर मार्गांचा वापर केला. त्यांनी तक्रारदाराला न्यायालयात याचिका दाखल करण्यास सांगितले.
पोलिसांनी या प्रकरणी न्यायालयात सविस्तर अहवाल सादर केला आणि पैसे परत मिळवण्यासाठी आवश्यक ते आदेश मिळवले.अखेर, पोलिसांच्या अथक प्रयत्नांना यश आले. तब्बल 1.60 लाख रुपयांची फसवणुकीची रक्कम न्यायालयाच्या आदेशानंतर तक्रारदाराच्या मूळ खात्यात सुरक्षितपणे जमा झाली. ही रक्कम परत आल्यानंतर पोलिसांनी तक्रारदाराला प्रतिकात्मक चेक देऊन त्यांना याची माहिती दिली.
ही कौतुकास्पद कामगिरी पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे आणि सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यात सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, वैभव धनवडे, महिला पोलीस हवालदार माधुरी धिंडे, महिला पोलीस अंमलदार सुवर्णा माळी, स्नेहल पुणे, पोलीस अंमलदार राहुल बन, कुणाल सावळे, विलास खाटीक आणि पोलीस उपनिरीक्षक राजेश भरकडे यांनी महत्त्वाचा सहभाग नोंदवला.
