CRIME NEWS : पत्नीने सोडल्याच्या रागातून जावयाचा सासऱ्यावर जीवघेणा हल्ला
लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
1 मिनट पठन

लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे, महाराष्ट्र मिरर, CRIME NEWS: पत्नी आपल्याला सोडून माहेरी राहत असल्याच्या रागातून आणि कौटुंबिक वादातून एका माथेफिरू जावयाने सासऱ्यावर सशस्त्र हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मावळ तालुक्यातील कुसगाव जवळील कातकरवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, आरोपीचा शोध सुरू आहे. शांताराम चंदू वाल्हेकर (वय ४५) असे जखमीचे नाव आहे.CRIME NEWS

संजू बाळाराम वाल्हेकर (रा. तांबडी गाव, ता. रोहा, जि. रायगड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत विमल शांताराम वाल्हेकर यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विमल हिची बहीण चंदा हिचा विवाह संजू वाल्हेकर याच्याशी झाला होता. मात्र, काही कौटुंबिक मतभेद आणि वादांमुळे चंदाने संजूला सोडले होते आणि ती आपल्या माहेरी कातकरवाडी येथे राहत होती. पत्नीने सोडल्याचा ्आणि ती माहेरी राहत असल्याचा राग संजू याच्या मनात होता. याच रागातून गुरुवारी (दि. ११) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास संजू हा कातकरवाडी येथील गुरववस्तीत आला. त्याने आपले सासरे शांताराम वाल्हेकर यांना बोलण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर बोलावून नेले. रात्रभर शांताराम हे घरी परतले नसल्याने त्यांचा कुटुंबिय शोध घेत असताना शुक्रवारी सकाळी ते परिसरातील एका निर्जन स्थळी गंभीर जखमी अवस्थेत सापडले.CRIME NEWS
बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या शांताराम यांना नातेवाईकांनी तात्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. जावई संजू वाल्हेकर यानेच जुन्या रागातून शांताराम यांना घरातून नेऊन हा जीवघेणा हल्ला केल्याचा संशय फिर्यादी विमल व तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक म्हेत्रे करत आहेत.
CRIME NEWS
