CRIME NEWS : दौंड तालुक्यात सशस्त्र दरोडेखोरांचा धुमाकूळ; ७.१० लाखांची लूट
खोरवडी-आलेगाव शिवारात वस्त्यांवर दरोडे; शस्त्रांचा धाक दाखवून रहिवाशांना मारहाण
2 मिनट पठन

खोरवडी-आलेगाव शिवारात वस्त्यांवर दरोडे; शस्त्रांचा धाक दाखवून रहिवाशांना मारहाण
पुणे CRIME NEWS: पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील खोरवडी आणि आलेगाव परिसरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास पाच ते सात सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने धुमाकूळ घालत वेगवेगळ्या वाड्या-वस्त्यांवर भीषण दरोडे टाकले आहेत. दरोडेखोरांनी चाकू, कोयते, लोखंडी सळया आणि लाकडी दांडक्यांचा धाक दाखवून रहिवाशांना बेदम मारहाण व जिवे मारण्याची धमकी देत तब्बल ७ लाख १० हजार रुपयांचा मौल्यवान ऐवज जबरीने लुटून नेला आहे.CRIME NEWS

एकाच रात्री वेगवेगळ्या कुटुंबांना लक्ष्य करून करण्यात आलेल्या या सशस्त्र दरोड्याच्या थरारक घटनेमुळे संपूर्ण दौंड तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली असून ग्रामीण भागात भीतीचे सावट पसरले आहे.
या अत्यंत गंभीर आणि धाडसी दरोड्यांच्या घटनेप्रकरणी दौंड पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष मल्हारी शिंदे (वय ५० वर्षे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाच ते सात अज्ञात सशस्त्र दरोडेखोरांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१०(२), ३११, ११८(१) सह शस्त्र अधिनियम (आर्म्स ॲक्ट) कलम ४ व २५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.CRIME NEWS
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. १०) मध्यरात्रीच्या सुमारास सर्व ग्रामस्थ गाढ झोपेत असताना पाच ते सात दरोडेखोरांच्या सशस्त्र टोळीने खोरवडी व आलेगाव शिवारातील अवदे वस्ती व इतर वाड्यांवर हल्ला केला. दरोडेखोरांच्या हातात धारदार चाकू, कोयते, लोखंडी रॉड, पाईप आणि लाकडी काठ्या होत्या. त्यांनी वस्तीवरील रहिवाशांना शस्त्रांचा धाक दाखवून ओलीस ठेवले आणि आरडाओरडा केल्यास जिवे मारण्याची थेट धमकी दिली. प्रतिकार करणाऱ्या नागरिकांना त्यांनी लाठ्या-काठ्यांनी आणि लोखंडी सळ्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर चोरट्यांनी घरांची उचकटपाचकट करून मुद्देमाल शोधण्यास सुरुवात केली. यामध्ये सोन्याचे दागिने कपाटातून तसेच घरमालकांनी चोरट्यांच्या भीतीने धान्याच्या पोत्यांमध्ये लपवून ठेवलेले लाखो रुपयांचे दागिनेही दरोडेखोरांनी शोधून काढून पळवले. या दरोड्यांमध्ये दरोडेखोरांनी तब्बल ७ लाख १० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि इतर वस्तू लुटल्या. या लुटमारीमध्ये सोन्याचे विविध दागिने, रोख रक्कम, दोन मोबाईल फोन आणि दोन दुचाकी वाहनांचा समावेश आहे. यानंतर हे दरोडेखोर लुटलेल्या दोन दुचाकींवरून अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.CRIME NEWS
घटनेची माहिती मिळताच दौंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (एलसीबी) पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी नागरिकांना तात्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. या गुन्ह्याचा पुढील तपास दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम करत आहेत.CRIME NEWS
दरोडेखोरांचे धागेदोरे शोधण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण सुरू केले असून संशयित आरोपींचा माग काढण्यासाठी पुणे ग्रामीण गुन्हे शाखेची विशेष पथके दौंड आणि शेजारील तालुक्यांच्या सीमांवर रवाना करण्यात आली आहेत.
CRIME NEWS
