देहुरोडमध्ये भाजप कार्यकर्त्याची गोळ्या घालून हत्या
हत्येमागील नेमके कारण अस्पष्ट, वैयक्तिक वैर किंवा राजकीय कारणांचा तपास केला जात आहे
1 मिनट पठन

हत्येमागील नेमके कारण अस्पष्ट, वैयक्तिक वैर किंवा राजकीय कारणांचा तपास केला जात आहे
पुणे: मावळ तालुक्यातील देहुरोड परिसरात गोळीबाराची थरारक घटना घडून एका भाजप कार्यकर्त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहुरोडमध्ये रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. रमेश रेड्डी (भाजपचे सक्रिय कार्यकर्ते) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक गोळीबार केला. या हल्ल्यात तब्बल नऊ राऊंड फायरिंग करण्यात आली.
या गोळीबारात एक गोळी थेट रमेश रेड्डी यांच्या मस्तकाला लागल्याने ते घटनास्थळीच कोसळले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने देहुरोड येथील आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती समजताच परिसरात मोठी गर्दी जमली आणि काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.
या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, वैयक्तिक वैर किंवा राजकीय कारणांचा तपास केला जात आहे. देहुरोड पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
BJP worker shot dead in Dehuroad
