Mumbai News : बदलापूरमध्ये 'डिजिटल अरेस्ट'चा धक्कादायक प्रकार; 84 वर्षांच्या सेवानिवृत्त वृद्धाला तब्बल 5 कोटी 4 लाखांचा गंडा!'
Mumbai News : बदलापूर/ठाणे : - सायबर गुन्हेगारांचे जाळे दिवसेंदिवस किती भीषण आणि घातक होत चालले आहे, याचा एक अत्यंत संतापजनक व धक्कादायक प्रकार बदलापूरमध्ये उघडकीस आला आहे.
2 मिनट पठन

Mumbai News : CBI अन् नाशिक गुन्हे शाखेचे बनावट अधिकारी बनून लुटली आयुष्याची कमाई; 5 जणांविरोधात बदलापूर पोलिसांत गुन्हा दाखल'
Mumbai News : बदलापूर/ठाणे :- सायबर गुन्हेगारांचे जाळे दिवसेंदिवस किती भीषण आणि घातक होत चालले आहे, याचा एक अत्यंत संतापजनक व धक्कादायक प्रकार बदलापूरमध्ये उघडकीस आला आहे. सीबीआय (CBI) आणि नाशिक गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे भासवून बदलापूर पूर्व येथील एका 84 वर्षीय सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला 'डिजिटल अरेस्ट' (Digital Arrest) च्या नावाखाली तब्बल 5 कोटी 4 लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याची घटना घडली आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news
आर्थिक गैरव्यवहाराच्या खोट्या गुन्ह्यात आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) कारवाईत अडकवण्याची धमकी देऊन सायबर भामट्यांनी या ज्येष्ठ दांपत्याच्या आयुष्याची संपूर्ण पुंजी लुटली आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'9 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबरदरम्यान थरार; खोट्या सुप्रीम कोर्टाच्या कागदपत्रांचा वापर'
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर पूर्व येथील गावदेवी परिसरात राहणाऱ्या 84 वर्षीय सेवानिवृत्त नागरिकाच्या व्हॉट्सॲपवर 9 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2026 या कालावधीत अनोळखी क्रमांकावरून व्हिडिओ कॉल्स आले. फोन करणाऱ्या भामट्यांनी स्वतःला नाशिक गुन्हे शाखेचे उच्चपदस्थ पोलीस अधिकारी आणि सीबीआयचे प्रतिनिधी असल्याचे सांगितले.
ज्येष्ठ नागरिकाचा विश्वास संपादन करण्यासाठी आणि त्यांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी भामट्यांनी व्हॉट्सॲपवर सर्वोच्च न्यायालय (Supreme Court), अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि नाशिक इन्फॉर्मेशन रिपोर्ट अशी नावे असलेली खोटी कायदेशीर कागदपत्रे पाठवली. तसेच कॅनरा बँकेच्या एका एटीएम कार्डचा फोटो पाठवला, ज्यावर संबंधित ज्येष्ठ नागरिकाचे नाव छापलेले होते.
'कॅनरा बँकेच्या खात्यातून बेकायदेशीर व्यवहारांची भीती; व्हिडिओ कॉलवर सतत ठेवली पाळत'
भामट्यांनी वृद्धाला धमकावत सांगितले की, "तुमच्या नावाने कॅनरा बँकेत उघडलेल्या खात्यातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर पैशांची देवाणघेवाण आणि मनी लाँडरिंग झाले आहे. या प्रकरणी तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते."
अटक टाळायची असल्यास तुमच्या सर्व बँक खात्यांमधील बचत आणि ठेवी तात्काळ 'भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) सुरक्षेखाली' हस्तांतरित कराव्या लागतील, असा बनाव त्यांनी रचला. वृद्ध दांपत्य घराबाहेर पडू नये किंवा कोणाशी संपर्क साधू नये म्हणून आरोपींनी त्यांना 24 तास फोन आणि व्हिडिओ कॉलवर ऑनलाईन ठेवून त्यांच्या प्रत्येक हालचालीवर सतत 'डिजिटल' पाळत ठेवली.
'5.04कोटींची आरटीजीएसद्वारे उधळपट्टी; गंजेश कुमार यादवसह साथीदारांवर गुन्हा दाखल'
भीतीच्या छायेखाली असलेल्या वृद्ध दांपत्याकडून भामट्यांनी त्यांच्या सर्व बँक खात्यांची अत्यंत गोपनीय माहिती मिळवली. त्यानंतर अटकेच्या दहशतीखाली आरटीजीएस (RTGS) द्वारे टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या बँक खात्यांवर तब्बल 5 कोटी 4 लाख रुपये वर्ग करण्यास भाग पाडले.
काही दिवसांनंतर सर्व जमापुंजी संपल्यावर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या पीडित वृद्धाने बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपबिती सांगितली.
या तक्रारीवरून पोलिसांनी स्वतःला सेंट्रल बोर्ड ऑफ गव्हर्नमेंटचा कायदेशीर सल्लागार सांगणारा गंजेश कुमार यादव, पोलीस अधिकारी सांगणारा संदीप राव आणि त्यांच्या इतर अनोळखी साथीदारांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण आंतरराज्य सायबर रॅकेटचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे करत आहेत.
