मुख्य सामग्री पर जाएँ

Builder Amit Lunkad Pune : वडगाव शेरीतील प्लॉटवर जबरदस्ती ताब्याचा प्रयत्न

बिल्डर अमित लुंकड, राज व रुपेश ढाकलिया यांच्यासह ३० ते ४० जणांवर गुन्हा

पघ
प्रशिक घस्ते

2 मिनट पठन

Builder Amit Lunkad Pune : वडगाव शेरीतील प्लॉटवर जबरदस्ती ताब्याचा प्रयत्न

बिल्डर अमित लुंकड, राज व रुपेश ढाकलिया यांच्यासह ३० ते ४० जणांवर गुन्हा

लुंकड यांना २०२१ मध्ये गुंतवणूकदारांची फसवणूक केल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती

पुणे: वडगाव शेरी परिसरातील एका प्लॉटचा जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ट्रॅक्टर, डंपरच्या सहाय्याने कम्पाऊंड गेट तोडून सुरक्षा रक्षकाला मारहाण करत प्लॉटमध्ये घुसखोरी करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक अमित लुंकड, राज ढाकलिया यांच्यासह ३० ते ४० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत रवींद्र हिरालाल दुगड (वय ५८, रा. पुष्पा हाईट्स, बिबवेवाडी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अमित लुंकड, राज ढाकलिया, रुपेश ढाकलिया, बिडकर, अमित लुंकड यांचा मॅनेजर तसेच अन्य ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

जबरदस्तीने प्लॉटचा ताबा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव शेरी येथील सर्व्हे नंबर ३० मधील प्लॉटवर ७ मे रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. आरोपींनी ट्रॅक्टर व डंपरच्या सहाय्याने प्लॉटचे कम्पाऊंड गेट तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी तेथे असलेल्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यात आली. तसेच जबरदस्तीने प्लॉटचा ताबा घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विमानतळ पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

लुंकड यांच्याविरोधात यापूर्वीही आर्थिक गुन्हे शाखेकडे अनेक तक्रारी
दरम्यान, बांधकाम व्यावसायिक अमित लुंकड यांच्याविरोधात यापूर्वीही आर्थिक गुन्हे शाखेकडे अनेक तक्रारी दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

त्यांपैकी प्रामुख्याने गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या तक्रारी आहेत.

गुंतवणूकदारांना दरमहा १.५ टक्के किंवा वार्षिक १४% ते १५% इतक्या आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून 'लुंकड रियाल्टी' कंपनीच्या विविध ठेव योजनांमध्ये पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले गेले. सुरुवातीला परतावा मिळाला, परंतु २०१९ पासून तो मिळणे बंद झाले आणि मूळ रक्कमही परत मिळाली नाही, असा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

दाखल तक्रारींची संख्या
जून २०२१ पर्यंत सुमारे ३८ गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या, ज्यामध्ये सुमारे ४८ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आकडा समोर आला होता. त्यानंतरही अनेक तक्रारी येत राहिल्या असून, २०२५ पर्यंत हा आकडा ५० कोटी रुपयांच्या पुढे गेल्याची माहिती आहे.

प्रविणचंद जैन यांनी १३.४२ कोटी रुपयांच्या फसवणुकीची तक्रार दिली होती. संजय होनराव यांच्या तक्रारीनंतर लुंकड यांना २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती. याशिवाय खिवंसरा-चव्हाण (२६.७० कोटी), अशोक रायसोनी (८.३८ कोटी) आणि इतर अनेक गुंतवणूकदारांनीही आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज दिले आहेत.

Copyright Disclaimer: This post includes copyrighted material used under Fair Dealing (Section 52, Copyright Act, 1957) for the purpose of news reporting, criticism, review and public awareness. All rights belong to the respective owners.

शेयर करें