Ashok Kharat : कॅप्टन खरातचे 'राजकीय' कनेक्शन उघड; मिलिंद नार्वेकरांसह अनेक दिग्गज नेत्यांचे फोटो व्हायरल
Ashok Kharat Political Connection : सिन्नरच्या 'ईशान्येश्वर' दरबारात सत्ताधारी अन् विरोधकांची मांदियाळी; 200 कोटींची बेनामी मालमत्ता आणि 58 अश्लील व्हिडिओंच्या विळख्यात अडकला भोंदू बाबा
2 मिनट पठन

Ashok Kharat Political Connection : सिन्नरच्या 'ईशान्येश्वर' दरबारात सत्ताधारी अन् विरोधकांची मांदियाळी; 200 कोटींची बेनामी मालमत्ता आणि 58 अश्लील व्हिडिओंच्या विळख्यात अडकला भोंदू बाबा
नाशिक :- आध्यात्मिक गुरु आणि अंकशास्त्रज्ञाचा मुखवटा घालून महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात उर्फ 'कॅप्टन' याच्या पापकर्मांचा घडा आता भरला आहे. नाशिक पोलिसांनी केलेल्या अटकेनंतर या प्रकरणात दररोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. विशेष म्हणजे, या भोंदू बाबाचे जाळे केवळ सर्वसामान्यांपर्यंतच मर्यादित नसून, महाराष्ट्राच्या राजकारणातील बड्या धेंडांपर्यंत पोहोचल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
बड्या नेत्यांचे 'कॅप्टन' कनेक्शन चव्हाट्यावर
अशोक खरात याने सिन्नरमधील मिरगाव येथे 'श्री ईशान्येश्वर मंदिर' नावाचे भव्य संस्थान उभारले होते. या ठिकाणी राजकारण्यांची मोठी उठबस असायची.
ठाकरे गटाचे कनेक्शन: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते मिलिंद नार्वेकर यांचे खरातसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांची हजेरी: केवळ नार्वेकरच नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील नेते सुनील तटकरे, जयंत पाटील, निलेश लंके, सरोज अहिरे आणि भाजपचे दिग्गज नेते विखे पाटील यांच्यासह महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचेही फोटो समोर आले आहेत. सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंचे नेते या भोंदूच्या दरबारात हजेरी लावत असल्याचे दिसून येत आहे.
गुंगीचे औषध देऊन अत्याचार आणि 'SIT' तपास
एका 35 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, खरातने तिला गुंगीचे औषध देऊन वारंवार तिच्यावर बलात्कार केला आणि कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी जेव्हा खरातच्या फार्महाऊसवर छापा टाकला, तेव्हा तिथे पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि मोठी रोख रक्कम सापडली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) खरातचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला असून, त्यामध्ये ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले आहेत.
200 कोटींचे साम्राज्य आणि आर्थिक गुन्हे शाखेचा फेरा
मर्चंट नेव्हीतील नोकरी सोडल्यानंतर अशोक खरातने अल्पावधीत इतकी मोठी संपत्ती कशी जमवली, याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेमार्फत (EOW) केला जात आहे. नाशिक, सिन्नर आणि शिर्डी परिसरात त्याची सुमारे 200 कोटी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता असल्याचा संशय पोलिसांना आहे. 'अंकशास्त्रज्ञ' आणि 'कॉस्मॉलॉजी तज्ज्ञ' बनून त्याने केवळ महिलांची फसवणूकच केली नाही, तर जमिनींचे मोठे व्यवहार करून काळी माया जमवली आहे.
