Pune Crime: ऊसतोडीच्या उचलीच्या पैशातून अपहरण; आठ जणांना अटक
Pune Crime: पिंपरी-चिंचवड, महाराष्ट्र मिरर : ऊसतोड टोळीच्या उचलीच्या पैशाच्या वादातून राजेश बाळू चव्हाण यांचे मोटारसायकलसह अपहरण केल्याप्रकरणी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी आठ जणांना अटक केली.
2 मिनट पठन

Pune Crime: आंबेठाणमधून मोटारसायकलसह पळवले; यवतमाळमधून २४ तासांत सुटका, कारसह तीन रिक्षा जप्त
Pune Crime: पिंपरी-चिंचवड, महाराष्ट्र मिरर : ऊसतोड टोळीच्या उचलीच्या पैशाच्या वादातून राजेश बाळू चव्हाण यांचे मोटारसायकलसह अपहरण केल्याप्रकरणी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी आठ जणांना अटक केली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढत पोलिसांनी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातून चव्हाण यांची अवघ्या २४ तासांत सुखरूप सुटका केली. गुन्ह्यात वापरलेली ह्युंदाई व्हेन्यू कार, तीन ऑटो रिक्षा तसेच अपहृत व्यक्तीची मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime
ही घटना ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील आंबेठाण येथील घाटे वस्तीत घडली. तीन रिक्षांमधून आलेल्या व्यक्तींनी राजेश चव्हाण यांचे त्यांच्या मोटारसायकलसह अपहरण केल्याचे पोलिसांनी सांगितले.https://maharashtramirror.com/ Pune Crime
याप्रकरणी सुषमा राजेश चव्हाण (वय ३०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३५/२०२६ नोंदविण्यात आला. भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीसीटीव्ही, तांत्रिक तपासातून मिळाला माग
अपहरणाचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आणि अपहृत व्यक्तीच्या जीवाला धोका असल्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. त्यासोबत तांत्रिक माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला.
तपासादरम्यान अमोल रामराव राठोड, सचिन रामराव राठोड आणि निलेश संतोष राठोड यांना शिक्रापूर येथून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीतून या अपहरण प्रकरणातील अन्य आरोपींबाबत माहिती मिळाल्याचे पोलिसांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
उचलीच्या पैशाच्या वादातून अपहरण
पोलिसांच्या तपासानुसार, संदीप गुलाब राठोड याच्या ऊसतोड टोळीच्या उचलीच्या पैशासंदर्भात राजेश चव्हाण यांच्याशी वाद होता. याच कारणातून आठ जणांनी मिळून चव्हाण यांचे अपहरण केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
आरोपी तीन रिक्षांमधून घाटे वस्ती येथे आले. तेथून राजेश चव्हाण यांना त्यांच्या मोटारसायकलसह घेऊन गेल्याचे पोलिसांनी सांगितले.
थेट यवतमाळपर्यंत पोलिसांचा माग
शिक्रापूरमधून तिघांना ताब्यात घेतल्यानंतर उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने पुढील माहितीच्या आधारे यवतमाळ जिल्ह्यात कारवाई केली. उमरखेड तालुक्यातील दिंडाळा येथे जाऊन उर्वरित आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईदरम्यान राजेश बाळू चव्हाण यांची गुन्हा घडल्यापासून २४ तासांच्या आत सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले.
आठ आरोपींना अटक
या प्रकरणात अमोल रामराव राठोड, सचिन रामराव राठोड, निलेश संतोष राठोड, शुभम प्रल्हाद जाधव, संदीप गुलाब राठोड, इंदल बाबराव जाधव, राजू बापुराव चव्हाण आणि संदीप उदयभान जाधव यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
यातील बहुतांश आरोपी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील दिंडाळा येथील रहिवासी असून राजू चव्हाण हा वरुड बीबी, तर संदीप उदयभान जाधव हा नाईकनगर तांडा येथील रहिवासी असल्याचे प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
कार, तीन रिक्षांसह मोटारसायकल हस्तगत
अटक आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली ह्युंदाई व्हेन्यू कार, तीन ऑटो रिक्षा आणि अपहृत राजेश चव्हाण यांची मोटारसायकल असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे करीत आहेत.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर आणि सहायक पोलीस आयुक्त प्रिया डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे यांच्यासह उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने ही कारवाई केल्याचे पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे.
