पुण्यात 'मोक्का’मधील फरार आरोपी जेरबंद
पुणे शहर पोलीस गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई
1 मिनट पठन

पुणे शहर पोलीस गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई
पुणे: सांगवी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ‘मोक्का’ (MCOCA) आणि अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत (NDPS) गुन्ह्यात गेल्या सहा महिन्यांपासून फरार असलेल्या एका कुख्यात आरोपीला पुणे शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक-१ ने शिताफीने अटक केली आहे. ताडीवाला रोड परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली असून, आरोपीला पुढील तपासासाठी सांगवी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

जुनेद अफजल खान (वय ३५, रा. रविवार पेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत सांगवी पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विक्री आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमानुसार (मोक्का) गुन्हा (गु.र.क्र. ५९६/२०२५) दाखल होता. या गुन्ह्यात तो गेल्या सहा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.
ताडीवाला रोडवर रचला सापळा
अमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांना माहिती मिळाली की, सांगवीतील मोक्काच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी जुनेद खान हा ताडीवाला रोडवरील विनायक नगरीसमोर येणार आहे. या माहितीची खातरजमा करून पथकाने त्या परिसरात सापळा रचला आणि जुनेद तिथे येताच त्याला वेढा घालून ताब्यात घेतले.
अभिलेखवरील गुन्हेगार; न्यायालयाचे वॉरंटही जारी
अटकेतील आरोपी जुनेद खान हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील (अभिलेखवरील) गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी अमली पदार्थ विक्रीचे दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. फरासखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट (Non-Bailable Warrant) देखील जारी केले होते.
सदरची यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार निलेश जाधव, रिहान पठाण, मंगेश गुंड आणि अक्षय शिर्के यांच्या पथकाने केली आहे.
Absconding accused in 'Mokka' arrested in Pune
