पुणे मनपा बनले टक्केवारीचे कुरण; आपचे जन आंदोलन
निकृष्ट कामाची बीले काढण्यासाठी ठेकेदारांना लाखो रुपयांची खंडणी, टक्केवारी आजी-माजी नगरसेवकांना द्यावी लागत असल्याचा पक्षाचा दावा
2 मिनट पठन

निकृष्ट कामाची बीले काढण्यासाठी ठेकेदारांना लाखो रुपयांची खंडणी, टक्केवारी आजी-माजी नगरसेवकांना द्यावी लागत असल्याचा पक्षाचा दावा
बाणेर येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहाच्या तीन कोटी रुपयांच्या बीलाच्या टक्केवारी वरुन सत्ताधारी भाजपच्या आजी आणि माजी नगरसेविकांत जोरदार भांडणे झाली. हाणामारी पर्यंत गेलेल्या या घटनेने पालिकेच्या विकास कामात कामांच्या उत्तम दर्जा पेक्षा टक्केवारी किती महत्त्वाची आहे हे पुन्हा उघडकीस आले आहे.

निलेश राऊत
पुणे: स्मार्ट सिटी आणि विद्येचे माहेरघर म्हणून देशभर ओळख असलेल्या पुणे शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात येणारी विकास कामे अधिकारी व नगरसेवकांच्या संगणमताने अत्यंत निकृष्ट दर्जाची होत आहेत. निकृष्ट कामाची बीले काढण्यासाठी ठेकेदारांना लाखो रुपयांची खंडणी, टक्केवारी आजी-माजी नगरसेवकांना द्यावी लागत आहे. टक्केवारीचे कुरण बनलेल्या पुणे पालिकेच्या विरोधात आम आदमी पार्टी (आप) आक्रमक झाली असून टक्केवारीला पायबंद घालण्यासाठी पालिका भवनात भ्रष्टाचार मुक्त जन आंदोलन सुरू करण्याचा निर्धार आम आदमी पार्टीने केला आहे.
या बाबत आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर आणि सुदर्शन जगदाळे व पदाधिकाऱ्यांनी पालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन दिले आहे.
थोरांनी घडविलेले पुणे
आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले, "समाजसुधारक महात्मा फुले यांनी ब्रिटिश राजवटीत पालिकेचा कारभार भ्रष्टाचार मुक्त व्हावा यासाठी लढा दिला. स्वातंत्र्यसेनानी गणपतराव नलावडे, जेष्ठ विचारवंत एस.एम. जोशी, नानासाहेब गोरे, नानासाहेब परुळेकर, बाबुराव सणस, नामदेवराव मते, भाई वैद्य आदींच्या निस्वार्थी व त्यागी नेतृत्वामुळे पुण्याच्या वैभवात भर पडली. याचा विसर अलिकडच्या काळात पालिकेच्या सत्ताधाऱ्यांना पडत चालला आहे."
दोन आजी-माजी नागरसेविकेंचे भांडण
बेनकर म्हणाले, "पालिकेच्या मुख्यालयातच भाजपच्या माजी नगरसेविका राजश्री काळे व विद्यमान नगरसेविका रोहिणी चिमटे यांचे कामाच्या टक्केवारीवरुन काल बुधवारी जोरदार भांडण झाले. शहर व जनतेच्या विकासापेक्षा स्वतःला टक्केवारी मिळावी यासाठी आजी माजी नगरसेविका अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन भांडण करतात यामुळे पुणेकरांच्या विश्वासाला तडा गेला आहे. या घटनेचा आम आदमी पार्टी व पुणेकरांच्या वतीने तीव्र निषेध करतो.
बाणेर येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहाच्या तीन कोटी रुपयांच्या बीलाच्या टक्केवारी वरुन सत्ताधारी भाजपच्या आजी आणि माजी नगरसेविकांत जोरदार भांडणे झाली. हाणामारी पर्यंत गेलेल्या या घटनेने पालिकेच्या विकास कामात कामांच्या उत्तम दर्जा पेक्षा टक्केवारी किती महत्त्वाची आहे हे पुन्हा उघडकीस आले आहे. त्यामुळे या कथित टक्केवारी प्रकरणाचे संपूर्ण सत्य बाहेर यावे, ताबडतोब चौकशी समिती स्थापन करावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी. या प्रकराची प्रशासनासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठ दिवसांत तात्काळ दखल घ्यावी. अशी मागणी आम आदमी पक्षाने यावेळी केली.
Pune Municipal Corporation has become a pasture for percentage; AAP's public movement
