मुंढव्यात बंद घर फोडून ५ लाखांचा ऐवज चोरला
चोरट्याने संसारोपयोगी आणि मौल्यवान साहित्य लांबवले
1 मिनट पठन

चोरट्याने संसारोपयोगी आणि मौल्यवान साहित्य लांबवले
पुणे: मुंढव्यातील केशवनगर भागात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ५ लाख ८ हजार रुपये किमतीचे संसारोपयोगी साहित्य चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी घराला कुलूप लावून बाहेर गेलेले असताना चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप उचकटून हा डल्ला मारला.
याप्रकरणी मुंढवा येथील एका ४२ वर्षीय व्यक्तीने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०५(ए), ३३१(३) आणि ३३१(४) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

सुमारे दोन महिने घर होते बंद
मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरी ४ मार्च ते २७ एप्रिल या कालावधीत घडली. फिर्यादी यांचे केशवनगरमधील गायकवाड फार्म परिसरातील श्रीनाथ पार्क, कावेरी हाईटस् समोर राहते घर कुलूप लावून बंद होते. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप उचकटले आणि घरात प्रवेश केला.
किमती साहित्यावर मारला डल्ला
चोरट्याने घरातील कपाटांची झडती घेऊन ५ लाख ८ हजार रुपये किमतीचे संसारोपयोगी आणि मौल्यवान साहित्य चोरून नेले. फिर्यादी २७ एप्रिल रोजी दुपारी एकच्या सुमारास घरी परतले असता, त्यांना दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. घरात जाऊन पाहिले असता सर्व साहित्य चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. मुंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.
