26 नोव्हेंबरला मुंबईत राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक; सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे आणि रोहित पवार उपस्थित राहणार,मोर्चावर निर्णयाची शक्यता
शेगाव ते नागपूर शेतकरी मोर्चाच्या घोषणेनंतर पक्षातील घडामोडींना वेग; हिवाळी अधिवेशनाची रणनीती आणि दुष्काळी प्रश्नांवर होणार मंथन
2 मिनट पठन

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची येत्या 26 नोव्हेंबर रोजी मुंबईत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार उपस्थित राहणार असून, विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच शेगाव ते नागपूर मोर्चाच्या आयोजनाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
शेगाव ते नागपूर मोर्चावर 26 नोव्हेंबरच्या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता; “गुप्त बैठकीच्या चर्चा हास्यास्पद” – सुप्रिया सुळे
विदर्भातील दुष्काळी परिस्थिती, पीक विम्याचा प्रश्न आणि शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी शेगाव ते नागपूर मोर्चा काढण्याची घोषणा केल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. या मोर्चाच्या आयोजनाबाबत विदर्भातील काही पदाधिकाऱ्यांमध्ये एकमताचा अभाव असल्याचे आणि वरिष्ठ नेतृत्वाच्या मान्यतेचा मुद्दा पुढे येत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, रोहित पवार यांनी नागपूरमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठक घेतल्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत अशा चर्चा हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. तर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही कार्यकर्त्यांना आंदोलनापासून दूर राहण्यास सांगितल्याच्या दाव्यांचे खंडन करत, 26 नोव्हेंबरच्या बैठकीत आगामी अधिवेशनाची रणनीती, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या आणि प्रस्तावित मोर्चावर चर्चा केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
हिवाळी अधिवेशनाची रणनीती आणि शेतकऱ्यांच्या मागण्या
आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्याची रणनीती पक्षाकडून आखली जात आहे. विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या समस्या, दुष्काळाची स्थिती आणि पीक विम्यासह विविध मागण्यांवर २६ नोव्हेंबरच्या बैठकीत सखोल मंथन होणार असून, मोर्चाबाबतची अंतिम दिशा या बैठकीतून स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
https://epaper.maharashtramirror.com/

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper
