पिंपरी-चिंचवड, हडपसरमध्ये विषारी दारूचे १७ बळी
मुख्य संशयित आणि साथीदारांना अटक; बळींची संख्या वाढण्याची भीती
2 मिनट पठन

मुख्य संशयित आणि साथीदारांना अटक; बळींची संख्या वाढण्याची भीती
मुख्य मुद्दे
पुणे: विषारी गावठी दारू प्यायल्याने पिंपरी-चिंचवड मध्ये फुगेवाडीत १२ तर हडपसरमध्ये ५ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमागे दोन्ही ठिकाणी दारू पुरवणारी एकच व्यक्ती आहे. त्याला व त्याने जिथे ही दारू पुरवली तेथील अवैध दारू अड्डे चालवणारांना अटक करण्यात आली आहे.

स्पिरिट, मिथेनॉल व घातक रसायनांचे मिश्रण
प्राथमिक तपासानुसार मुख्य संशयित योगेश वानखेडे याने हडपसर येथे स्पिरिट, मिथेनॉल व घातक रसायनांची दारू तयार करून हडपसर आणि फुगेवाडी येथे विकली. वानखेडे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. घटनेनंतर तो राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर हजर झाला. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मुख्य आरोपीसह इतर आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
वानखेडे काळेपडळ येथे गेली चार वर्षांपासून बेकायदेशीर दारू तयार करून शहराच्या आसपास पुरवत होता. यापूर्वी चतु:श्रृंगी आणि हडपसर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत.
हडपसर परिसरातील मृतांची नांवे आहेत राहुल शरद क्षीरसागर (वय ४५ वर्षे), विजय भू कुरलाल शर्मा (वय ४५ वर्षे), अरुण डाडर, अशोक रमेश चव्हाण (रा. काळेपडळ) आणि यांत आणखी एकाचा समावेश आहे.
पिंपरीत पांडुरंग सदाशिव फुगे (वय ५७), विजय प्रकाश राठोड (वय ३१), राजेंद्र प्रकाश राठोड (वय ३४), राजेंद्र राजपूत (वय ५१), अकबर पठाण (वय ५२),आनंद देसाई (वय ५३), आणि आनंदा निकाळजे (वय ३५) यांचा मृत्यू झाला आहे.
फुगेवाडी परिसरातील मृतांत पांडुरंग फुगे, विजय प्रकाश राठोड आणि राजेंद्र प्रकाश राठोड (हे दोघे सख्खे भाऊ आहेत), राजू राजपूत, अकबर पठाण, बाबा शेख, आनंद देसाई आणि आनंद निकाळजे यांचा समावेश आहे.
गेल्या ४८ तासांत रुग्णालयात दगावलेल्यांत अक्षय अवसरमल (वायसीएम रुग्णालय), सौरभप्पा भंगारी (मेडीपॉईंट रुग्णालय) आणि भीमाप्पा बसवंत पुजारी (वायसीएम रुग्णालय) हे आहेत.
सुभाष डिगीकर (मेडीपॉईंट हॉस्पिटल, पुणे) यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पीडितांत मळमळ, चक्कर येणे, अंधुक दिसणे आणि अचानक प्रकृती खालावणे अशी समान लक्षणे आढळून आली आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांत टप्प्याटप्प्याने मृत्यू होत गेल्यामुळे सुरुवातीला नेमके कारण समजू शकले नाही. मात्र वैद्यकीय तपासणी आणि पोलिस तपासानंतर विषारी दारूचे सेवन हेच मृत्यूमागील कारण असल्याचा संशय बळावला आहे.
दरम्यान, विविध रुग्णालयांमध्ये अनेक पीडित उपचार घेत असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
नागरिकांमध्ये संतापाची लाट
याप्रकरणावरून आता पुण्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरणही तापले असून, अशा जीवघेण्या अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पिंपरी-चिंचवड व पुणे पोलिसांच्या ढिसाळ कार्यपद्धतीवर स्थानिक नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर योगेश बहल यांनी थेट पोलिसांवर आसूड ओढले आहेत. “अवैध हातभट्ट्यांवर पोलीस मेहेरबान का आहेत? या निष्पाप जीवांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर आणि अवैध विक्रेत्यांवर तात्काळ मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून सखोल चौकशी व्हावी,” अशी आग्रही मागणी त्यांनी लावून धरली आहे.
पोलिसांनी सुरुवातीला हे मृत्यू वेगवेगळ्या नैसर्गिक कारणांमुळे आणि आजारपणामुळे झाल्याचा दावा करत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. मात्र, वैद्यकीय अहवाल आणि आरोपीच्या अटकेनंतर सत्य समोर आल्याने पोलिसांची चांगलीच कोंडी झाली आहे.
