२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला १८ वर्षे; शहीदांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली
मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात औपचारिक परेड; दहशतवादाविरोधात भारताची भूमिका ठाम असल्याचा फडणवीसांचा इशारा
2 मिनट पठन

मुंबई, महाराष्ट्र मिरर – मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला आज १८ वर्षे पूर्ण झाली. या हल्ल्यात प्राण गमावलेल्या शूर सुरक्षा जवानांसह निष्पाप नागरिकांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित औपचारिक परेडमध्ये सहभागी होत त्यांनी शहीदांच्या बलिदानाचे स्मरण केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, '२६/११, क्रूरतेची काळरात्र! मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या भारतमातेच्या वीरपुत्रांना व निष्पाप नागरिकांना भावपूर्ण आदरांजली,' अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी संविधान दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.
'हा हल्ला भारताच्या सार्वभौमत्वावर होता'
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, २६/११ चा दिवस आपण कधीही विसरू शकत नाही. हा हल्ला केवळ ताज हॉटेल, ट्रायडेंट किंवा सीएसटीवर नव्हता, तर भारताच्या सार्वभौमत्वावर आणि संविधानावर केलेले आव्हान होते. अजमल कसाबला जिवंत पकडल्यामुळे संपूर्ण जगासमोर पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघड करता आला. भविष्यात अशा प्रकारचा हल्ला पुन्हा होऊ द्यायचा नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
गेल्या काही वर्षांत देशातील दहशतवादी कारवायांना प्रभावीपणे प्रत्युत्तर देण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आपली ताकद दाखवून दिली असून, दहशतवादी हल्ले सहन केले जाणार नाहीत, असा स्पष्ट संदेश दिला आहे, असेही फडणवीस म्हणाले.
समुद्रमार्गे आलेल्या दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईत केलेल्या या हल्ल्यात १६६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला, तर सुमारे ७०० जण जखमी झाले. या कारवाईत १८ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वीरमरण आले. सुरक्षा दलांनी नऊ दहशतवाद्यांचा खात्मा केला, तर अजमल कसाबला जिवंत पकडण्यात यश मिळवले. पुढे त्याला न्यायालयीन प्रक्रियेनंतर फाशी देण्यात आली.
हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेत मोठे बदल
२६/११ च्या हल्ल्यानंतर देशाच्या दहशतवादविरोधी सुरक्षा व्यवस्थेत अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले. राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या धर्तीवर महाराष्ट्रात विशेष प्रशिक्षित कमांडो दल म्हणून 'फोर्स वन'ची स्थापना करण्यात आली. शीघ्रकृती दल अधिक सक्षम करण्यासह मुंबई पोलीस दलाला अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, वाहने आणि सीसीटीव्ही यंत्रणांनी सज्ज करण्यात आले. सागरी सुरक्षा, संवेदनशील ठिकाणांची निगराणी आणि आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, बदलत्या दहशतवादी आव्हानांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम आणि सतर्क ठेवण्याची गरज आजही कायम आहे.

महाराष्ट्र मिरर

