मुख्य सामग्री पर जाएँ

११ घर खरेदीदारांचे करार रद्द करण्याचा विकासाचा प्रयत्न महारेराने फेटाळला; अनुज गोयल अडचणीत?

गंगा अंबर फेज-२ प्रकल्पातील विकासकाला १ जानेवारी २०२५ पासून ताबा मिळेपर्यंत विलंबाचे व्याज देण्याचे आदेश; प्रत्येक घरखरेदीदाराला २० हजार रुपये खर्चापोटी देणार

विक्रांत कुलकर्णी
विक्रांत कुलकर्णी

5 मिनट पठन

११ घर खरेदीदारांचे करार रद्द करण्याचा विकासाचा प्रयत्न महारेराने फेटाळला
अनुज गोयल अडचणीत?

पुणे, महाराष्ट्र मिरर : पिंपरी-चिंचवड येथील गंगा अंबर फेज-२, डी विंग या गृहप्रकल्पातील ११ घरखरेदीदारांचे सदनिकांचे करार रद्द करून त्या सदनिकांची पुनर्विक्री करण्याचा श्री सिद्धिविनायक डेव्हलपर्सचा प्रयत्न महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने (MahaRERA) फेटाळून लावला आहे. तसेच, सदनिकांचा प्रत्यक्ष ताबा भोगवटा प्रमाणपत्रासह (ओसी) देईपर्यंत १ जानेवारी २०२५ पासून विलंबित ताब्याचे व्याज देण्याचे आदेश प्राधिकरणाने विकासकाला दिले आहेत. याशिवाय प्रत्येक तक्रारदार घरखरेदीदाराला २० हजार रुपये खर्चापोटी देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

MahaRERA नोंदणी क्रमांक P52100026055 असलेल्या या प्रकल्पासंदर्भात प्राधिकरणाने २२ परस्परसंलग्न तक्रारींचा एकत्रित निपटारा केला. यामध्ये ११ तक्रारी घरखरेदीदारांनी विकासकाविरोधात, तर ११ प्रतितक्रारी विकासकाने संबंधित घरखरेदीदारांविरोधात दाखल केल्या होत्या. घरखरेदीदारांनी रेरा कायद्याच्या कलम १८ नुसार विलंबित ताब्याचे व्याज आणि सदनिकांचा ताबा देण्याची मागणी केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून विकासकाने करार रद्द करणे, आठ दिवसांत रद्दीकरण दस्तऐवज करून घेणे आणि सदनिकांची पुनर्विक्री करण्याची परवानगी मागितली होती. तसेच पाच लाख रुपये नुकसानभरपाई आणि एक लाख रुपये खटल्याचा खर्च देण्याची मागणीही केली होती.

नोंदणीकृत करारातील ताब्याची तारीख ई-मेलने बदलता येणार नाही

या प्रकरणातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विकासकाला प्रकल्पाच्या नोंदणीला मिळालेली मुदतवाढ आणि ९ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तांच्या आधारे सदनिकांच्या ताब्याची तारीख पुढे ढकलता येते का, हा होता. सर्व ११ सदनिकांच्या नोंदणीकृत विक्री करारांमध्ये ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत ताबा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, विकासकाने बैठकीचे इतिवृत्त आणि त्यानंतरच्या ई-मेल संवादांचा आधार घेत घरखरेदीदारांनी मुदतवाढ स्वीकारल्याचा दावा केला.

घरखरेदीदारांना ३० जून २०२६ पर्यंत ताबा देण्याचे कळविण्यात आले होते आणि त्यांनी त्यास संमती दिली होती, असा विकासकाचा युक्तिवाद होता. २३ डिसेंबर २०२४ रोजी पाठविलेल्या ई-मेलमध्ये सुधारित मुदत स्वीकारण्याचा किंवा बुकिंग रद्द करून पैसे परत घेण्याचा पर्याय दिला होता. त्यानंतरही घरखरेदीदारांनी बुकिंग कायम ठेवल्याचे विकासकाने नमूद केले.

मात्र, प्राधिकरणाने हा युक्तिवाद अमान्य केला. प्रकल्पाच्या नोंदणीला दिलेली मुदतवाढ हा प्रशासकीय निर्णय असून, त्यामुळे विकासक आणि घरखरेदीदार यांच्यातील नोंदणीकृत विक्री करारातील ताब्याची तारीख आपोआप बदलत नाही, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले. करारातील मुदत बदलण्यासाठी केवळ ई-मेल किंवा बैठकीचे इतिवृत्त पुरेसे नसून, त्यासाठी योग्य नोंदणीकृत पूरक करार करणे आवश्यक असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले.

कोविड, दिवाणी दावा आणि कामबंदीचा युक्तिवादही अमान्य

प्रकल्पाच्या विलंबासाठी विकासकाने गंगा ऑरम पार्क सहकारी गृहनिर्माण संस्थेने दाखल केलेला दिवाणी दावा, कोविड महामारी, मजुरांशी संबंधित अडचणी आणि उप कामगार आयुक्तांनी २५ मे २०२३ रोजी जारी केलेल्या कामबंदी आदेशाचा आधार घेतला होता. १५ सप्टेंबर २०२२ रोजी बांधकामस्थळी २१ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर हा आदेश देण्यात आल्याचे विकासकाने सांगितले.

करारातील फोर्स मॅज्युअर तरतुदींचा आधार घेत सरकारी निर्बंध आणि परवानग्यांमधील विलंबामुळे बांधकामावर परिणाम झाल्याचा दावा विकासकाने केला. मात्र, घरखरेदीदारांनी हे स्पष्टीकरण फेटाळले. त्यांचे करार कोविड महामारी सुरू झाल्यानंतर करण्यात आले होते, त्यामुळे महामारीचे कारण देऊन विलंबाचे समर्थन करता येणार नाही, असे त्यांनी मांडले. तसेच दिवाणी दावा हा गंगा ऑरम या वेगळ्या प्रकल्पाशी संबंधित असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.

प्राधिकरणाने विकासकाचे हे स्पष्टीकरण घरखरेदीदारांच्या वैधानिक हक्कांवर मात करण्यासाठी पुरेसे नसल्याचे स्पष्ट केले. नोंदणीला मिळालेली मुदतवाढ मूळ करारातील ताब्याची अंतिम तारीख रद्द करू शकत नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले.

घरखरेदीदारांवर थकबाकीचा आरोप; विकासकाची प्रतितक्रार फेटाळली

विकासकाने घरखरेदीदारांनी हप्ते भरले नसल्याचा आरोप केला होता. करारातील कलम १४ आणि रेरा कायद्याच्या कलम ११(५) चा आधार घेत १५ दिवसांची नोटीस दिल्यानंतर करार रद्द करून सदनिका परत घेण्याचा अधिकार असल्याचा दावा विकासकाने केला. ११ सदनिकांमधील कथित थकबाकी सुमारे ७.७० लाख रुपयांपासून जवळपास २० लाख रुपयांपर्यंत असल्याचे विकासकाने सांगितले.

मात्र, बांधकामातील संबंधित टप्पे पूर्ण झाले नसताना हप्त्यांची मागणी करणे अकाली असल्याचे घरखरेदीदारांनी म्हटले. थकबाकीच्या गणनेवरही त्यांनी आक्षेप घेतला. स्वतंत्र १५ दिवसांच्या नोटिसा दिल्या नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. वैध थकबाकीची पडताळणी झाल्यानंतर ती भरण्यास तयार असल्याचे घरखरेदीदारांनी स्पष्ट केले.

डी-३०१ सदनिकेच्या खरेदीदाराने विकासकाने सदनिकेची किंमत १ लाख ५७ हजार ४९२ रुपयांनी वाढवून दाखवल्याचा आणि पार्किंगसाठी स्वतंत्रपणे भरलेल्या तीन लाख रुपयांची नोंद न घेतल्याचा आरोप केला होता.

विकासक स्वतःच्या प्रकल्पातील विलंबासाठी बाह्य कारणे देत असताना दुसरीकडे घरखरेदीदारांवर पैसे थकविल्याचा आरोप करीत असल्याचे प्राधिकरणाने निदर्शनास आणले. करारातील कलम १४ चा विकासकाने केलेला अर्थ लावणे योग्य नसल्याचे तसेच बांधकामाच्या टप्प्यांनुसार देयकांची मागणी करण्यासाठी आवश्यक कामही विकासकाने पूर्ण केले नसल्याचे प्राधिकरणाने नमूद केले. त्यामुळे घरखरेदीदारांचे करार रद्द करण्याची विकासकाची मागणी फेटाळण्यात आली.

घरभाडे आणि गृहकर्जाच्या हप्त्यांचा आर्थिक भार

घरखरेदीदारांनी सदनिकांचा ताबा मिळत नसल्याने एकीकडे गृहकर्जाचे मासिक हप्ते आणि दुसरीकडे घरभाडे भरावे लागत असल्याचे प्राधिकरणासमोर सांगितले. डी-९०४ सदनिकेच्या खरेदीदाराने ३७ हजार ६५१ रुपये गृहकर्जाचा हप्ता आणि ३३ हजार रुपये घरभाडे भरावे लागत असल्याचे नमूद केले. डी-५०४ च्या खरेदीदाराने ३२ हजार २०६ रुपये ईएमआय आणि १४ हजार रुपये भाडे, तर डी-५०१ च्या खरेदीदाराने १८ हजार ५३८ रुपये ईएमआय, १,१०० रुपये विमा आणि २० हजार रुपये भाडे भरावे लागत असल्याचे सांगितले.

डी-८०४ सदनिकेच्या खरेदीदाराने बुकिंग १९ ऑक्टोबर २०२२ रोजी रद्द करण्यात आले आणि नंतर अधिक किंमतीत पुन्हा निश्चित करण्यात आल्याचा स्वतंत्र आरोप केला. आधीची किंमत ५६ लाख ४२ हजार २६ रुपये होती, तर नंतरची किंमत ६० लाख ५२ हजार ८०० रुपये करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.

घरखरेदीदारांनी मानसिक त्रास, घरभाडे आणि ईएमआयच्या स्वतंत्र नुकसानभरपाईची मागणी केली होती. मात्र, प्राधिकरणाने स्वतंत्र नुकसानभरपाई मंजूर केली नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या ‘नीलकमल’ प्रकरणातील निर्णयाचा आधार घेत कलम १८ अंतर्गत मिळणारे व्याज हेच भरपाईच्या स्वरूपाचे असल्याचे स्पष्ट केले. तथापि, हक्कांसाठी प्राधिकरणाकडे धाव घ्यावी लागल्याने प्रत्येक घरखरेदीदाराला २० हजार रुपये खर्चापोटी देण्याचे आदेश दिले.

ओसीसह ताबा मिळेपर्यंत व्याज द्यावे लागणार

प्राधिकरणाच्या अंतिम निर्देशानुसार, करारानुसार कायदेशीररीत्या देय असलेली उर्वरित रक्कम स्वीकारल्यानंतर विकासकाने ११ सदनिकांचा ताबा द्यायचा आहे. सदनिकांच्या मोबदल्यापोटी घरखरेदीदारांनी भरलेल्या रकमेवर महाराष्ट्र रेरा नियम, २०१७ मधील नियम १८ नुसार निर्धारित दराने १ जानेवारी २०२५ पासून प्रत्यक्ष ताबा आणि भोगवटा प्रमाणपत्र मिळेपर्यंत व्याज द्यावे लागणार आहे.

घरखरेदीदारांकडून कायदेशीररीत्या देय असलेल्या उर्वरित रकमेतून व्याजाची रक्कम समायोजित करण्याची परवानगी विकासकाला देण्यात आली आहे. समायोजनानंतर व्याजाची काही रक्कम शिल्लक राहिल्यास ती सदनिकांचा ताबा देताना संबंधित घरखरेदीदारांना अदा करावी लागणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे, व्याजाची गणना केवळ सदनिकेच्या मोबदल्यापोटी भरलेल्या रकमेनुसार केली जाणार आहे. मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, कर आणि इतर वैधानिक शुल्क या गणनेत समाविष्ट केले जाणार नाहीत. याशिवाय, विकासकाला प्रत्येक ११ तक्रारींसाठी प्रत्येकी २० हजार रुपये खर्चापोटी द्यावे लागणार आहेत. मात्र, प्राधिकरणाने स्वतंत्र दंड किंवा मानसिक त्रासापोटी अतिरिक्त नुकसानभरपाई मंजूर केलेली नाही.

शेयर करें
विक्रांत कुलकर्णी

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper