मुख्य सामग्री पर जाएँ

हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रोला ‘कनेक्टिव्हिटी’चे बळ

पार्किंगपासून फीडर बसपर्यंत नियोजन; चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांचा पुढाकार

विक्रांत कुलकर्णी
विक्रांत कुलकर्णी

2 मिनट पठन

हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रोला ‘कनेक्टिव्हिटी’चे बळ
पार्किंगपासून फीडर बसपर्यंत नियोजन; चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांचा पुढाकार

"हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो ही केवळ आयटी कर्मचाऱ्यांसाठी नव्हे, तर पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची सुविधा आहे. मेट्रोचा लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळण्यासाठी स्थानकांपर्यंत पोहोचण्याची सुविधा, फीडर बस, पुरेशी पार्किंग व्यवस्था आणि अन्य सार्वजनिक वाहतूक सेवांशी समन्वय आवश्यक आहे. वाकड मेट्रो स्थानक प्रमुख वाहतूक केंद्र म्हणून विकसित झाल्यास शहरातील अनेक भागांची कनेक्टिव्हिटी सुलभ होईल. खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी करून वाहतूक कोंडी सोडविण्यासही मदत होईल." - शंकर जगताप, आमदार, चिंचवड विधानसभा

पिंपरी: मेट्रो धावू लागली, प्रवाशांचा प्रतिसादही वाढू लागला; मात्र स्थानकापर्यंत पोहोचायचे कसे, वाहन कुठे लावायचे आणि पुढचा प्रवास कोणत्या वाहतुकीने करायचा, या प्रश्नांची उत्तरे अद्याप शोधावी लागत आहेत. हीच अडचण दूर करण्यासाठी हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रोला सार्वजनिक वाहतुकीच्या अन्य पर्यायांची जोड देण्याचा पुढाकार चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी घेतला आहे. बहुमजली स्वयंचलित पार्किंग, दहा किलोमीटरच्या परिघात फीडर बस, एकात्मिक प्रवास नियोजन ॲप आणि एकत्रित तिकीट व्यवस्था अशा उपाययोजनांचा त्यांनी प्रस्ताव मांडला आहे. वाकड मेट्रो स्थानकाला प्रमुख वाहतूक केंद्र म्हणून विकसित करण्यावरही त्यांनी भर दिला आहे.

आमदार शंकर जगताप यांनी सोमवारी (१६ नोव्हेंबर) वाकड चौक ते माण फेज तीन या मार्गावर मेट्रोतून प्रवास केला. या वेळी वाकड मेट्रो स्थानक परिसराची पाहणी करून प्रवासी, आयटी क्षेत्रातील कर्मचारी आणि नागरिकांशी संवाद साधला. पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (पीआयटीसीएमआरएल), पीएमपीएमएल, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या प्रतिनिधींशीही विविध सुविधांबाबत चर्चा करण्यात आली.

हिंजवडी मेट्रोमुळे आयटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळत असून, तिचा लाभ केवळ आयटी क्षेत्रापुरता मर्यादित न राहता पिंपरी-चिंचवडमधील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे, अशी भूमिका जगताप यांनी मांडली. पुनावळे, ताथवडे, वाकड, मामुर्डी, किवळे आणि रावेत या भागांतील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मेट्रोची जोडसेवा सक्षम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

वाकड स्थानकाला पिंपरी, चिंचवड, पिंपळे सौदागर, सांगवी, निगडी, रावेत आणि आळंदी परिसरातील बससेवेशी जोडण्याची सूचना करण्यात आली. स्थानकांपासून निवासी व व्यावसायिक भागांपर्यंत सौरऊर्जायुक्त संरक्षित स्कायवॉक, पादचारी आणि दिव्यांगांसाठी सुरक्षित सुविधा उभारण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. या सूचनांचा संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

मेट्रो प्रवासासाठी सुचविलेल्या सुविधा....

* मेट्रो स्थानकांजवळ बहुमजली स्वयंचलित पार्किंग व्यवस्था.

* स्थानकांपासून दहा किलोमीटरच्या परिघात नियमित फीडर बस सेवा.

* वाकड स्थानकाचे प्रमुख वाहतूक केंद्र म्हणून विकसन.

* विविध सार्वजनिक वाहतूक सेवांशी बसमार्गांची जोडणी.

* मेट्रो, बसचे वेळापत्रक, लोकेशन आणि प्रवासखर्चासाठी एकात्मिक ॲप.

* मेट्रो आणि फीडर बससाठी एकत्रित तिकीट व सवलतीचे पास.

* प्रवाशांच्या तक्रारींसाठी मेट्रो–प्रवासी समन्वय समिती.

* सुरक्षित स्कायवॉक आणि सायकलस्वारांसाठी सुविधा.

शेयर करें
विक्रांत कुलकर्णी

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper