सतत विचारांच्या चक्रात अडकताय? ओव्हरथिंकिंगचा आरोग्यावर होतोय परिणाम!
झोपेचा अभाव, चिंता, चिडचिड आणि एकाग्रतेवर परिणाम; विचारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी जीवनशैलीत बदल करण्याचा सल्ला
2 मिनट पठन

स्मिता कुलकर्णी
पुणे, मिरर प्रतिनिधी : दिवसभर कामाच्या व्यापात व्यस्त असणाऱ्या अनेकांच्या मनात रात्री झोपण्यापूर्वी विचारांचे चक्र सुरू होते. दिवसभर घडलेल्या घटना, मुलांची चिंता, नोकरीतील ताण, आर्थिक प्रश्न आणि भविष्याची काळजी अशा अनेक विचारांमुळे झोप येण्यास अडचण निर्माण होते. एखाद्या गोष्टीचा वारंवार विचार करणे आणि त्यातून बाहेर पडता न येणे, याला ‘ओव्हरथिंकिंग’ असे म्हटले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात वाढता ताण आणि अनिश्चिततेमुळे ही समस्या अनेकांना जाणवत आहे. दीर्घकाळ ओव्हरथिंकिंग सुरू राहिल्यास मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
आरोग्यावर काय होतात परिणाम?
सततच्या विचारांमुळे तणाव वाढू शकतो. त्यामुळे झोप न लागणे, वारंवार जाग येणे, दिवसभर थकवा जाणवणे, चिडचिड होणे आणि एकाग्रता कमी होणे अशा समस्या उद्भवू शकतात. काही व्यक्तींमध्ये डोकेदुखी, स्नायूंमध्ये ताण, पचनाच्या तक्रारी आणि अस्वस्थता जाणवू शकते. सतत नकारात्मक विचार केल्याने चिंता वाढण्याची शक्यता असते. दीर्घकाळ ताण राहिल्यास दैनंदिन कामकाज आणि नातेसंबंधांवरही परिणाम होऊ शकतो.
ओव्हरथिंकिंग कमी करण्यासाठी काय करावे?
विचार लिहून काढा : मनात सुरू असलेले विचार कागदावर लिहा आणि त्यातील कोणत्या गोष्टींवर आपण प्रत्यक्ष कृती करू शकतो, हे ठरवा.
झोपेची वेळ निश्चित करा : झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर कमी करा आणि शांत वातावरणात झोपण्याचा प्रयत्न करा.
ध्यान आणि दीर्घ श्वसन : दररोज काही मिनिटे ध्यान, श्वसनाचे व्यायाम किंवा योग करा.
व्यायामासाठी वेळ द्या : नियमित चालणे आणि शारीरिक हालचालींमुळे तणाव कमी होण्यास मदत होऊ शकते.
वर्तमानावर लक्ष केंद्रित करा : भूतकाळातील घटनांचा वारंवार विचार करण्याऐवजी सध्याच्या क्षणावर लक्ष द्या.
ओव्हरथिंकिंगमुळे झोप, कामकाज किंवा दैनंदिन जीवनावर सातत्याने परिणाम होत असल्यास मानसिक आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. विचार पूर्णपणे थांबवण्यापेक्षा त्यांना योग्य दिशा देणे आणि तणाव हाताळण्याच्या सवयी विकसित करणे अधिक उपयुक्त ठरते.
-
ओव्हरथिंकिंग ही आजच्या धावपळीच्या जीवनातील सामान्य पण दुर्लक्षित समस्या आहे. विचार पूर्णपणे थांबवणे शक्य नसते, पण त्यांना योग्य दिशा देता येते. नियमित झोप, व्यायाम, ध्यान आणि विचार लिहून काढण्याची सवय उपयुक्त ठरते. तसेच झोपण्यापूर्वी मोबाईलपासून दूर राहणेही महत्त्वाचे आहे. त्रास सातत्याने जाणवत असल्यास संकोच न करता मानसिक आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.”
– डॉ.संदिप जगताप मानसोपचारतज्ज्ञ, पुणे

महाराष्ट्र मिरर
