मुख्य सामग्री पर जाएँ

संजय शिरसाट यांच्या घरावरील हल्ल्याला नवे वळण; तिन्ही तरुण उच्चशिक्षित, एक जर्मनीत नोकरीला!

दारूची पार्टी केल्यानंतर मध्यरात्री आणखी दारूच्या शोधात निघाले; सुरक्षारक्षकांसोबत झालेल्या वादातून हल्ल्याची घटना घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज

सक
स्मिता कुलकर्णी

2 मिनट पठन

संजय शिरसाट यांच्या घरावरील हल्ल्याला नवे वळण; तिन्ही तरुण उच्चशिक्षित, एक जर्मनीत नोकरीला!
संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी ः राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेला आता नवे वळण मिळाले आहे. तीन तरुणींनी दगड आणि काचेच्या बाटलीने त्यांच्या घरावर हल्ला केल्याची घटना समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. या हल्ल्यामागे नेमके कारण काय, याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात असतानाच पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणातील तिन्ही आरोपी उच्चशिक्षित असून त्यापैकी एक जण जर्मनीतील खासगी कंपनीत नोकरीला असल्याचे समोर आले आहे.

शिरसाट यांच्या निवासस्थानावर हल्ला केल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरमधील सातारा पोलिसांनी तिन्ही तरुणांना काही मिनिटांतच ताब्यात घेतले होते. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे तिघे संशयास्पद हालचाली करताना दिसून आले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता हल्ल्यामागील घटनाक्रम समोर आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीनिमित्त तिन्ही मित्र एकत्र आले होते. त्यांनी शहरातील एन-१ परिसरात आणि त्यानंतर उल्कानगरी येथे मद्यपान केले. रात्री उशिरा मद्यविक्रीची दुकाने बंद झाल्यानंतर आणखी दारू मिळेल, या अपेक्षेने ते गोलवाडी फाट्यावरील एका बारकडे गेले. याच परिसरात मंत्री संजय शिरसाट यांचे निवासस्थान आहे.

बारमधून बाहेर पडल्यानंतर सर्व्हिस रोडवर त्यांची दुचाकी घसरली. त्यानंतर तिघांनी परिसरात दोन ते तीन वेळा चकरा मारल्या. त्यांच्या संशयास्पद हालचाली पाहून शिरसाट यांच्या सुरक्षारक्षकांनी त्यांची चौकशी केली. यावेळी सुरक्षारक्षक आणि तरुणांमध्ये वाद झाला. याच वादातून पुढे हल्ल्याची घटना घडल्याची माहिती संबंधित तरुणांनी पोलिसांना दिल्याचे समजते. त्यामुळे हा प्रकार कोणत्याही राजकीय हेतूने नव्हे, तर प्रासंगिक वादातून घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र, आरोपींनी दिलेल्या माहितीची पडताळणी आणि या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

अटक केलेल्या तरुणांची पार्श्वभूमी

१. रोहित स्वप्निल भुताळे (वय २४)

राहणार : एन-१, सिडको, छत्रपती संभाजीनगर

शिक्षण : मास्टर ऑफ सायबर सिक्युरिटी

जर्मनीतील एका खासगी कंपनीत नोकरी.

२. शिवम ज्ञानेश्वर गायकवाड (वय २४)

राहणार : उद्योगपुष्प, उल्कानगरी, छत्रपती संभाजीनगर

शिक्षण : एम.एस्सी.

पुढील शिक्षण घेत आहे.

३. प्रतीक चांगदेव कुटे (वय २५)

आरोपी तिघांपैकी एक.

शेयर करें
सक

बातमीदार-उपसंपादक

महाराष्ट्र मिरर