‘शायना एनसी कोण? सावरकरांबद्दल त्यांना काय माहिती?’; सोनिया गांधींच्या पुस्तकावरून काँग्रेसचा शिंदेसेनेला टोला
सचिन सावंत यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; ‘खोक्यापासून सुरू होणारी विचारधारा खोक्यावरच संपते’
2 मिनट पठन

मुंबई, महाराष्ट्र मिरर : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्रावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पुस्तकात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत अवमानकारक उल्लेख करण्यात आल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने केला आहे. याच निषेधार्थ शिंदे गटाच्या महिला नेत्यांनी पत्रकार परिषद घेत पुस्तकाची प्रत फाडली. तसेच, सावरकरांचा अपमान उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का, असा सवालही शिंदेसेनेने उपस्थित केला. या प्रकरणावर आता काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.
शिवसेनेच्या महिला नेत्यांनी पत्रकार परिषदेत सोनिया गांधी यांच्या पुस्तकाचा निषेध करत उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. यावेळी शायना एनसी यांच्याकडून चुकून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोही फाडला गेला. या घटनेमुळे पत्रकार परिषदेत गोंधळ निर्माण झाला असून, राजकीय वर्तुळात त्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी शायना एनसी यांच्या सावरकरांवरील वक्तव्याच्या अधिकारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “कोण शायना एनसी? सावरकरांबद्दल त्यांना काय माहिती आहे? त्या इतिहासतज्ज्ञ कधीपासून झाल्या? सावरकरांच्या नातवाने जे मान्य केले आहे, त्यापलीकडे आणखी काय सांगणार? न्यायालयातही यावर शिक्कामोर्तब झाले आहे.”
पुढे शिंदे गटाच्या विचारधारेवर टीका करताना सावंत म्हणाले, “शिंदे गटाची कुठली विचारधारा आहे, हेच माहिती नाही. त्यांची विचारधारा खोक्यापासून सुरू होते आणि खोक्यावरच संपते. पुस्तक फाडून काय होणार? सत्य कधीही लपत नसते. सोनिया गांधी यांच्या पुस्तकाची विक्रमी विक्री झाली आहे. पुस्तकाच्या प्रती फाडून काय साध्य होणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दुसरीकडे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १४ व्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून सोशल मीडियावर साधे अभिवादनही करण्यात आले नसल्याचा मुद्दा शिंदेसेनेने उपस्थित केला आहे. त्यामुळे सावरकरांच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद आता काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा रंगताना दिसत आहे. या आरोप-प्रत्यारोपांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.

महाराष्ट्र मिरर
