लक्ष्मी रोडवर अतिक्रमण कारवाईचा धडाका
सत्ताधारी नगरसेवकांमध्ये पसरलेल्या शांततेचा फायदा घेत विरोधकांची मिश्किल टोलेबाजी
3 मिनट पठन

पुणे: शहरातील वाहतूक कोंडी फोडणे आणि पादचाऱ्यांच्या हक्काचे पदपथ मोकळे करणे, या उद्देशाने पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक मोहीम तीव्र केली आहे. फर्ग्युसन कॉलेज रोडवरील कारवाईनंतर पालिकेचा बुलडोझर थेट शहराच्या मध्यवर्ती भागात आणि प्रमुख व्यापारी पेठ असलेल्या लक्ष्मी रोडवर धडकला आहे. मात्र, ही कारवाई सुरू होताच महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, याचे तीव्र पडसाद आज महापालिकेच्या मुख्य सभागृहात उमटले.
"अतिक्रमण कारवाई थांबवण्यासाठी कोणाचाही फोन आला, तर संबंधिताचे नाव थेट जाहीर करेन," असा स्पष्ट आणि खणखणीत इशारा आयुक्तांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला होता. दरम्यान लक्ष्मी रोड वर झालेल्या कारवाईमुळे प्रशासनाच्या या कडक पवित्र्याने कारवाई रोखायची कशी, असा पेच लोकप्रतिनिधींसमोर निर्माण झाला आहे. याच मुद्द्यावरून आज मुख्य सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली आणि गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज तब्बल १५ ते २० मिनिटे ठप्प झाले होते.
सत्ताधाऱ्यांच्या बालेकिल्ल्यात बुलडोझर
एफसी रोडनंतर प्रशासनाने आपला मोर्चा लक्ष्मी रोडकडे वळवला. विशेष म्हणजे, लक्ष्मी रोड आणि लगतच्या परिसराचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक २४ आणि २५ मध्ये भारतीय जनता पक्षाचेच नगरसेवक मोठ्या संख्येने प्रतिनिधित्व करतात. प्रभाग २५ मधून स्वप्नाली पंडित, राघवेंद्र मानकर, स्वरदा बापट आणि कुणाल टिळक हे नगरसेवक आहेत. तर लक्ष्मी रोडचा पूर्व भाग, रास्ता पेठ आणि बुधवार पेठेचा काही भाग समाविष्ट असलेल्या प्रभाग २४ मधून कल्पना दिलीप बहिरट, उज्वला गणेश यादव, देवेंद्र प्रभाकर वडके आणि गणेश मधुकर बिडकर हे सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक कार्यरत आहेत. स्वतःच्याच प्रभागातील अतिक्रमणांवर हातोडा पडत असल्याने सत्ताधारी गोटात अस्वस्थता पसरली.
सभागृहात सन्नाटा आणि विरोधकांची टोलेबाजी
एकीकडे लक्ष्मी रोडवर जेसीबी आणि बुलडोझरच्या सहाय्याने अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे जमीनदोस्त केली जात असताना, दुसरीकडे महापालिकेची मुख्य सभा सुरू होती. सत्ताधाऱ्यांच्याच प्रभागात ही कारवाई सुरू असल्याची वार्ता सभागृहात येताच, संबंधित प्रभागातील नगरसेवकांमध्ये काही काळ शांतता पसरली. सभागृहातील ही अस्वस्थ शांतता हेरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सत्ताधाऱ्यांवर शाब्दिक बाण सोडायला सुरुवात केली.
या वेळी नगरसेवक अरविंद शिंदे यांनी सभागृहातील शांततेचा धागा पकडत, "इतना सन्नाटा क्यू है...? सभागृह नेते, लगेच फोन लावू नका!" अशी मिश्किल टिप्पणी केली. त्यांच्या या टोलेबाजीने सभागृहात एकच हशा पिकला. यानंतरही विरोधकांची कोपरखळी सुरूच राहिली. इतर विरोधी नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर उपरोधिक भाष्य करताना म्हटले की, "आम्ही विरोधक कोणाकडे काही शिवायला गेलो, तर साधे खिसेही शिवता येत नाहीत; पण हे सत्ताधारी गेले की टेलर स्वतःहून 'आणखी खिसे कुठे शिवायचे?' असे विचारत असतात." या मार्मिक टिप्पणीवर सत्ताधारी बाकांवरही स्मितहास्य उमटले, मात्र त्याच वेळी राजकीय कोंडी झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते.
नेत्यांची धावपळ आणि नागरिकांचा प्रश्न
सभागृहात हास्यविनोद आणि टोलेबाजी सुरू असतानाच, दुसऱ्या बाजूला प्रभाग क्रमांक २४ आणि २५ मधील सत्ताधारी नेते आणि नगरसेवक सभागृहातच एकत्र येऊन गंभीर चर्चा करताना दिसून आले. कारवाई सुरू होताच स्थानिक व्यापारी आणि कार्यकर्त्यांचे फोन खणखणू लागल्याने या नेत्यांची धावपळ सुरू झाल्याची चर्चा सभागृहाच्या आवारात रंगली होती. आयुक्तांच्या थेट इशाऱ्यामुळे उघडपणे फोन करून कारवाई थांबवणे कठीण झाले असले, तरी पडद्यामागून काय हालचाली होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लक्ष्मी रोड ही पुण्याची ओळख असलेली महत्त्वाची बाजारपेठ आहे. येथे होणारी अतिक्रमणे आणि वाहतूक कोंडी ही वर्षानुवर्षांची डोकेदुखी ठरली आहे. प्रशासनाने सुरू केलेली ही अतिक्रमणविरोधी मोहीम अशीच निर्भीडपणे आणि सातत्याने सुरू राहणार की राजकीय दबावापोटी लक्ष्मी रोडवरील कारवाईला ब्रेक लागणार, असा सवाल आता सर्वसामान्य पुणेकरांकडून उपस्थित केला जात आहे. रस्ते व पदपथ मोकळे राहिल्यास प्रवाशांना आणि पादचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper
