रोहित पवारांना बावनकुळेंचा कडक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील आरोपांवरून राजकीय वातावरण तापले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यांवरून राज्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.
2 मिनट पठन

पुणे, महाराष्ट्र मिरर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यांवरून राज्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रोहित पवार यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांना थेट इशारा दिला आहे. फडणवीस यांच्या विरोधात बेताल वक्तव्ये करणे थांबवावे आणि त्यांनी राज्याची तसेच देवेंद्र फडणवीस यांची माफी मागावी, अशी मागणी बावनकुळे यांनी केली. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्याविषयी होणारी टीका आता खपवून घेतली जाणार नाही, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. राज्यात जाणीवपूर्वक अस्थिरता आणि अराजकता निर्माण करण्याचे प्रयत्न काही जणांकडून सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
अजित पवार विमान अपघाताच्या मुद्द्यावरून वादाला तोंड
दोन दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर काही गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. या पत्रकार परिषदेत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख 'मफलरमॅन' असा केला होता. तसेच व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंग आणि फडणवीस यांचा एकत्रित फोटोही सादर केला होता. अजित पवार यांचा विमान अपघात घडवण्यामागे फडणवीस यांचा हात असल्याचा थेट आरोप आपण करत नसल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले होते. मात्र, संबंधित विमान कंपनीचे मालक आणि फडणवीस यांच्यातील संबंधांमुळे तपास यंत्रणांकडून निष्पक्ष चौकशी होईल का, अशी शंका त्यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली.
‘शरद पवारांचे संस्कार जपा’; बावनकुळेंचा सल्ला
बावनकुळे यांनी रोहित पवार यांना शरद पवार यांनी दिलेले संस्कार आणि राजकीय परंपरा जपण्याचा सल्ला दिला. खासदार सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात केलेली भूमिका योग्य असल्याचेही त्यांनी नमूद केले. रोहित पवार यांनी फडणवीस यांच्याबाबत अशा प्रकारची वक्तव्ये करणे टाळावे. त्यांची भूमिका राज्याच्या हिताची नाही. फडणवीस यांनी विकासाच्या राजकारणाला प्राधान्य दिले असून पक्षीय गटबाजीला महत्त्व दिलेले नाही, असे बावनकुळे म्हणाले. 'देवेंद्र फडणवीस यांच्या वाट्याला जाऊ नका, त्याचे परिणाम वाईट होतील. हा धमकीचा इशारा नाही,' असे विधान करत बावनकुळे यांनी रोहित पवार यांना सुनावले. दरम्यान, अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीवरून सुरू झालेला हा राजकीय वाद आता सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्षाचा नवा मुद्दा बनला आहे. बावनकुळे यांच्या इशाऱ्यानंतर रोहित पवार काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper
