रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चाला स्वपक्षातूनच विरोध?
विदर्भातील पदाधिकाऱ्यांना आंदोलनापासून दूर राहण्याच्या सूचना दिल्याची चर्चा; पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर येण्याची शक्यता
2 मिनट पठन

नागपूर, प्रतिनिधी : महायुती सरकारविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांना आता स्वपक्षातूनच विरोध होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आयोजित केलेल्या ‘न्यायहक्क ट्रॅक्टर मोर्चा’ला पक्षातीलच काही वरिष्ठ नेत्यांकडून विरोध होत असल्याचा दावा केला जात आहे. विदर्भातील जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना या मोर्चापासून दूर राहण्याच्या सूचना दिल्याचे समोर आल्याने पक्षांतर्गत मतभेदांची चर्चा अधिकच तीव्र झाली आहे.
रोहित पवार यांनी ट्रॅक्टर मोर्चाच्या नियोजनासाठी नागपूरमध्ये विदर्भातील ग्रामीण व शहरी जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत मोर्चाच्या नियोजनासह कार्यकर्त्यांच्या सहभागाबाबत चर्चा करण्यात आली. मात्र, बैठकीनंतर पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून संबंधित पदाधिकाऱ्यांना प्रदेश कार्यालयाकडून मिळणाऱ्या अधिकृत सूचनांचेच पालन करण्यास सांगण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.
इतकेच नव्हे, तर रोहित पवार यांच्या कोणत्याही आंदोलनात किंवा चळवळीत पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सहभागी होऊ नये, अशा सूचना दिल्याचा दावाही केला जात आहे. त्यामुळे आंदोलनाच्या तयारीसाठी बैठक घेऊनही प्रत्यक्षात पदाधिकाऱ्यांना सहभागी होण्यापासून रोखले जात असल्याने विदर्भातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सत्तेतील सहभागावरून मतभेद?
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा केंद्रातील एनडीए आणि राज्यातील महायुतीमध्ये सहभाग होणार असल्याच्या चर्चांना अलीकडे वेग आला आहे. या संभाव्य राजकीय समीकरणांना रोहित पवार यांनी विरोध केल्याची चर्चा आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्तेत सहभागी होणार नाही, पक्षाने तसा निर्णय घेतल्यास पर्यायी मार्ग निवडू, अशी भूमिका त्यांनी मांडल्याचा दावा केला जात आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाशी मतभेद निर्माण झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे ट्रॅक्टर मोर्चाला मिळणाऱ्या कथित विरोधामागे राजकीय मतभेद आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
४ डिसेंबरला शेगावमधून मोर्चाला प्रारंभ
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रोहित पवार यांनी ‘न्यायहक्क ट्रॅक्टर मोर्चा’चे आयोजन केले आहे. या मोर्चाला ४ डिसेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून सुरुवात होणार आहे. त्यानंतर मोर्चा बुटीबोरीमार्गे प्रवास करत ९ डिसेंबर रोजी नागपूर विधान भवनावर धडकणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्याचा या आंदोलनाचा उद्देश आहे. मात्र, पक्षातीलच पदाधिकाऱ्यांना मोर्चापासून दूर राहण्याच्या सूचना दिल्याच्या चर्चेमुळे आंदोलनाला संघटनात्मक पाठबळ कितपत मिळणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र मिरर
