मुख्य सामग्री पर जाएँ

रोहित पवारांची भूमिका वैयक्तिक; पक्षाची अधिकृत भूमिका नाही – सुप्रिया सुळे

व्हीएसआर कंपनी प्रकरणावर भाष्य टाळले; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत देण्याची मागणी

स्मिता कुलकर्णी
स्मिता कुलकर्णी

2 मिनट पठन

रोहित पवार आणि सुप्रिया सुळे

मुंबई : आमदार रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनी आणि विमान अपघात प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रोहित पवार यांच्या भूमिकेपासून काहीसे अंतर राखले आहे. रोहित पवार यांनी मांडलेली भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका नसून त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले.

रोहित पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत 'मफलर मॅन' असा उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दाखवला होता. तसेच व्हीएसआर कंपनीचे मालक, त्यांची मालमत्ता आणि गुन्हेगारी जगताशी कथित संबंध यावरून त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारले असता, "रोहित पवार यांनी पक्ष म्हणून पत्रकार परिषद घेतलेली नाही. त्यांनी स्वतःचे वैयक्तिक मत मांडले आहे. मी त्यांची संपूर्ण पत्रकार परिषद पाहिलेली नाही. त्यामुळे या प्रकरणातील तांत्रिक बाबींवर भाष्य करू शकत नाही," असे त्यांनी सांगितले. या प्रकरणाचा अहवाल येण्याची आपण सर्वांनी प्रतीक्षा करावी, असेही त्या म्हणाल्या.

मतदारसंघ पुनर्रचनेबाबत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट

मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरही सुप्रिया सुळे यांनी पक्षाची भूमिका मांडली. डिलिमिटेशनला विरोध करण्याची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या विषयावर पक्षातील नेत्यांची मते जाणून घेतली जातील. जितेंद्र आव्हाड यांचे पक्षासाठी मोठे योगदान असून, पक्षाच्या प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयप्रक्रियेत त्यांचे मत विचारात घेतले जाईल, असेही सुळे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखांची मदत द्या

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर बोलताना सुप्रिया सुळे यांनी सरकारकडे शेतकऱ्यांसाठी तातडीच्या मदतीची मागणी केली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना दोन पत्रे दिली आहेत. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, हेक्टरी एक लाख रुपयांची आर्थिक मदत करावी, तसेच पाण्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी त्यांनी केली.

याशिवाय विद्यार्थ्यांचे शाळा आणि महाविद्यालयांचे शुल्क माफ करण्याची मागणीही त्यांनी केली. "ही राजकारण करण्याची वेळ नाही. सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशीलतेने निर्णय घ्यावेत," असे आवाहन सुळे यांनी केले. बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेताना मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची माहिती प्रशासनाला देण्यात आली असून, पात्र शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणीही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

शेयर करें
स्मिता कुलकर्णी

रिपोर्टर-सबएडिटर

महाराष्ट्र मिरर