मुख्य सामग्री पर जाएँ

महालक्ष्मी रेसकोर्समधील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अमली पदार्थांचे सेवन;12 जणांची प्राथमिक चाचणी पॉझिटिव्ह, पोलिसांची धडक कारवाई

अत्याधुनिक अँटी नार्कोटिक्स व्हॅनद्वारे 55 जणांची तपासणी; उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी व्हॅनची पहिली यशस्वी कारवाई

विक्रांत कुलकर्णी
विक्रांत कुलकर्णी

2 मिनट पठन

महालक्ष्मी रेसकोर्समधील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अमली पदार्थांचे सेवन
12 जणांची प्राथमिक चाचणी पॉझिटिव्ह, पोलिसांची धडक कारवाई

मुंबई :- मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे आयोजित लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अमली पदार्थांचे सेवन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलने (ANC) अत्याधुनिक तपासणी व्हॅनच्या सहाय्याने केलेल्या कारवाईत 55 जणांची तपासणी केली असता, त्यातील १२ जणांची प्राथमिक चाचणी पॉझिटिव्ह आढळून आली आहे. या सर्व जणांना पुढील कायदेशीर व वैद्यकीय प्रक्रियेसाठी ताडदेव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अत्याधुनिक अँटी नार्कोटिक्स व्हॅनची पहिलीच कारवाई

महालक्ष्मी रेसकोर्सवरील लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान काही तरुणांनी अमली पदार्थांचे सेवन केल्याचा संशय पोलिसांना आला होता. त्यानुसार अँटी नार्कोटिक्स सेलने तत्काळ कारवाई करत घटनास्थळी 55 जणांची तपासणी केली. या प्राथमिक चाचणीत 12 जणांनी अमली पदार्थांचे सेवन केल्याचे संकेत मिळाले.

पॉझिटिव्ह आढळलेल्या सर्व 12 जणांना ताडदेव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर पुढील कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या अत्याधुनिक अँटी नार्कोटिक्स व्हॅनचा हा पहिलाच प्रत्यक्ष वापर ठरला असून, उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी ही मोहीम यशस्वी ठरली आहे. या व्हॅनच्या माध्यमातून शहरातील सर्व मोठ्या कार्यक्रमांवर व कॉन्सर्टवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

गोरेगाव कॉन्सर्ट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची सतर्कता

मुंबईतील लाईव्ह कॉन्सर्टमधील अमली पदार्थांच्या सेवनाचा मुद्दा यापूर्वीही गंभीर ठरला होता. काही महिन्यांपूर्वी 11 एप्रिल रोजी गोरेगाव येथे आयोजित एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये तीन ते चार हजार तरुणांची गर्दी जमली होती. त्या ठिकाणी मद्य व अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे काही तरुणांची प्रकृती बिघडली होती आणि ओव्हरडोसमुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता, तर एका तरुणीची प्रकृती गंभीर झाली होती. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता मुंबई पोलिसांनी मोठ्या कार्यक्रमांवर कडक निगराणी ठेवण्यास सुरुवात केली आहे.

शेयर करें
विक्रांत कुलकर्णी

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper