महागाईचा आणखी एक झटका! सीएनजी ९९ रुपयांवर
वर्षभरात पाचव्यांदा दरवाढ; घरगुती पीएनजीही दीड रुपयांनी महागला
2 मिनट पठन

पुणे, महाराष्ट्र मिरर : महागाईने त्रस्त असलेल्या पुणेकरांच्या खिशाला पुन्हा एकदा गॅस दरवाढीचा फटका बसणार आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) सीएनजी आणि घरगुती पीएनजीच्या दरात वाढ जाहीर केली आहे. सीएनजीच्या दरात प्रतिकिलो १.२५ रुपयांची, तर घरगुती पीएनजीच्या दरात प्रति एससीएम १.५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होणार असून, सीएनजीचा दर आता प्रतिकिलो ९९ रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे वाहनचालकांसह घरगुती गॅस वापरणाऱ्या ग्राहकांनाही महागाईचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे.
एमएनजीएलच्या नव्या दरानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव आणि हिंजवडी परिसरात सीएनजीसाठी प्रतिकिलो ९९ रुपये मोजावे लागणार आहेत. तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील घरगुती पीएनजीचा दर प्रति एससीएम ५३ रुपये झाला आहे. सीएनजीवर धावणाऱ्या रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहनधारकांच्या प्रवासखर्चात यामुळे वाढ होणार आहे. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम सार्वजनिक वाहतूक आणि दैनंदिन खर्चावरही होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात पुण्यात सीएनजीच्या दरात पाचव्यांदा, तर घरगुती पीएनजीच्या दरात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये प्रतिकिलो ९०.७५ रुपये असलेला सीएनजी आता ९९ रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच वर्षभरात सीएनजी प्रतिकिलो ८.२५ रुपयांनी महागला आहे. तर घरगुती पीएनजीच्या दरात याच कालावधीत एकूण २.३५ रुपयांची वाढ झाली आहे. सातत्याने होणाऱ्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे घरगुती आणि प्रवासाचे आर्थिक गणित बिघडण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, एकूण गॅस पुरवठ्यात आयात केलेल्या नैसर्गिक वायूचे (आरएलएनजी) प्रमाण वाढले आहे. परिणामी, गॅस खरेदी आणि आयातीवरील खर्चात वाढ झाली असून, त्याचा परिणाम ग्राहकांना द्याव्या लागणाऱ्या दरांवर झाला आहे. या वाढलेल्या खर्चामुळेच सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत वाढ करावी लागत असल्याचे एमएनजीएलकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सीएनजीचा दर आता शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचल्याने आगामी काळात आणखी दरवाढ होणार का, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
