मला ती सीतेच्या भूमिकेत अजिबात योग्य वाटली नाही” : तनिषा मुखर्जी
‘रामायण’मधील रणबीर कपूरच्या रामाचे आणि यशच्या रावणाचे कौतुक; साई पल्लवीमुळे दृश्यांशी जोडू शकले नसल्याचे मत
2 मिनट पठन

मुंबई : नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’मधील साई पल्लवीच्या सीतेच्या भूमिकेवर अभिनेत्री तनिषा मुखर्जीने नाराजी व्यक्त केली आहे. “साई पल्लवी नक्कीच उत्तम अभिनेत्री असेल, पण दुर्दैवाने मला ती सीतेच्या भूमिकेत अजिबात योग्य वाटली नाही,” असे तिने म्हटले आहे. अभिनेत्री काजोलची बहीण असलेल्या तनिषाने मंगळवारी (ता. २४) ‘एक्स’वर पोस्ट करून चित्रपटाबद्दल मत मांडले. याच पोस्टमध्ये तिने प्रभू श्रीरामांच्या भूमिकेतील रणबीर कपूर आणि रावणाच्या भूमिकेतील यश यांच्या अभिनयाचे भरभरून कौतुक केले.
‘रामायण’च्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. मात्र, प्रदर्शनापूर्वीच कलाकारांच्या निवडीवरून बरीच टीका झाली होती. रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत शोभणार नाही, असे अनेकांचे म्हणणे होते. साई पल्लवीच्या निवडीवरूनही वाद रंगला होता.
‘रणबीर भूमिकेसाठी अगदी योग्य’
आपण हा चित्रपट उशिरा पाहिल्याचे तनिषाने सांगितले. “मीडिया खूप दिशाभूल करत आहे. हा चित्रपट पूर्णपणे रामावर केंद्रित आहे. रणबीर कपूरचा अभिनय अप्रतिम आहे,” असे तिने लिहिले. ‘अॅनिमल’मधील रणबीरचा अभिनय आवडला होता, त्यामुळे तो प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत भावेल की नाही, अशी शंका होती. “पण देवा, तो या भूमिकेसाठी अगदी योग्य आहे,” असे तिने म्हटले आहे.
‘साई पल्लवीमुळे जोडू शकले नाही’
साई पल्लवीमुळे चित्रपटातील दृश्यांशी स्वतःला जोडू शकलो नाही, असे तनिषाने लिहिले. मात्र, दृश्यांची मांडणी आणि कलाकारांचा अभिनय अप्रतिम असल्याचेही तिने नमूद केले. “यशने साकारलेला रावणही उत्कृष्ट आहे. आपल्या भूमिकेला त्याने पूर्णपणे न्याय दिला आहे. रावण हा रामाला तगडी टक्कर देणारा आहे,” असे सांगत, हा चित्रपट आवर्जून पाहावा असाच आहे, असे मतही तिने व्यक्त केले.
योद्धा सीतेवरही प्रश्न
सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीची निवड झाल्यापासूनच चर्चा आणि वाद सुरू झाले होते. काहींनी ही निवड योग्य असल्याचे म्हटले, तर काहींनी या भूमिकेसाठी इतर अभिनेत्रींना पसंती दिली होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर राक्षसांचा सामना करणाऱ्या योद्ध्याच्या रूपातील सीतेच्या व्यक्तिरेखेवरही टीका झाली. सीतेचे पात्र अशा पद्धतीने दाखवण्यामागील सर्जनशील दृष्टिकोनावर काही प्रेक्षकांनी प्रश्न उपस्थित केले.
धनुषकडून पाठराखण
या वादाच्या पार्श्वभूमीवर ‘ओम’ चित्रपटातील साई पल्लवीचा सहकलाकार धनुष तिच्या समर्थनार्थ पुढे आला होता. ‘ओम’च्या प्रदर्शनापूर्वी आयोजित कार्यक्रमात त्याने सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीची झालेली निवड आणि व्यक्तिरेखेप्रती असलेल्या तिच्या भक्तीचे कौतुक केले होते. “तिने साकारलेल्या सीतेच्या भूमिकेवरून खूप गदारोळ सुरू आहे. मला हे समजत नाही. शूटिंगदरम्यान ब्रेक मिळाला तरी ती सतत प्रार्थना करत असायची. तिची देवावर खूप श्रद्धा आहे आणि तिचे मनही खूप निर्मळ आहे. ती दिसायलाही खूप सुंदर आहे आणि उत्तम अभिनेत्री आहे,” असे धनुष म्हणाला होता.
https://epaper.maharashtramirror.com/

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper
