मुख्य सामग्री पर जाएँ

भिडेवाडा स्मारकात उलगडणार फुले दाम्पत्याचा जीवनपट

आधुनिक होलोग्राफी आणि ऑडिओ-व्हिज्युअल शोची सुविधा

विक्रांत कुलकर्णी
विक्रांत कुलकर्णी

2 मिनट पठन

भिडेवाडा स्मारकात उलगडणार फुले दाम्पत्याचा जीवनपट
आधुनिक होलोग्राफी आणि ऑडिओ-व्हिज्युअल शोची सुविधा

पुणे, महाराष्ट्र मिरर : बुधवार पेठेतील ऐतिहासिक भिडेवाडा येथे साकारण्यात येत असलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारकाचे काम वेगाने सुरू असून, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी (दि. १४ नोव्हेंबर) स्मारकाच्या बांधकामाची पाहणी केली. सुमारे ३५ कोटी रुपये खर्चून उभारल्या जाणाऱ्या या स्मारकात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य आणि सामाजिक योगदान नव्या पिढीसमोर मांडले जाणार आहे.

या पाहणी दौऱ्यात भुजबळ यांनी प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. ऐतिहासिक भिडेवाड्याच्या सुमारे २७२.५७ चौरस मीटर जागेवर हे स्मारक विकसित केले जात असून, त्याचे एकूण प्रस्तावित बांधकाम क्षेत्र १,११४.५५ चौरस मीटर इतके आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे ३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, स्मारकाच्या इमारतीचे प्रमुख संरचनात्मक काम पूर्णत्वास गेले आहे. यामध्ये प्रबलित सिमेंट काँक्रिट (आरसीसी) काम, स्टील स्ट्रक्चर, वीटकाम तसेच इमारतीच्या आतील आणि बाहेरील प्लास्टरची कामे पूर्ण झाली आहेत. यासोबतच फॉल्स सिलिंगचा सांगाडा आणि अग्निसुरक्षा यंत्रणेची कामेही पूर्ण करण्यात आली आहेत. सध्या स्मारकातील विद्युत विषयक कामे आणि आधुनिक ऑडिओ-व्हिज्युअल व होलोग्राफी यंत्रणा बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

ही आहेत या स्मारकाची मुख्य आकर्षणे

नव्या पिढीला फुले दाम्पत्याचा संघर्ष आणि विचार प्रभावीपणे समजावेत, यासाठी स्मारकात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. स्मारकातील घुमटांमध्ये फुले दाम्पत्याच्या जीवनचरित्रावर आधारित विशेष थीमवर आधारित ऑडिओ-व्हिज्युअल शो दाखवले जातील. तसेच, त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्रांतीचे महत्त्वाचे टप्पे जिवंत करण्यासाठी होलोग्राफी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. याशिवाय त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित माहितीपट आणि इतर दृकश्राव्य सादरीकरणेही येथे पाहता येणार आहेत. या तांत्रिक कामांवर देखरेख ठेवण्यासाठी आणि मार्गदर्शनासाठी स्वतंत्र तज्ज्ञ समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकल्पाला आवश्यक त्या सर्व प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्या आहेत.

हे स्मारक केवळ ऐतिहासिक वास्तू न राहता सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे केंद्र व्हावे, यासाठी येथे अनेक लोकोपयोगी सुविधा उभारल्या जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने मुली व महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र, समृद्ध ग्रंथालय, मार्गदर्शन केंद्र, संगणक केंद्र आणि विविध सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांसाठी ॲम्फीथिएटर (खुले नाट्यगृह) यांचा समावेश आहे.

या पाहणीप्रसंगी पुणे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, भवन विभागाचे अधीक्षक अभियंता बिपिन शिंदे, उपायुक्त अविनाश संकपाळ यांच्यासह महापालिकेच्या संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कामाचा दर्जा राखून उर्वरित तांत्रिक कामे विहित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी भुजबळ यांनी प्रशासनाला दिल्या.

शेयर करें
विक्रांत कुलकर्णी

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper