मुख्य सामग्री पर जाएँ

बाळासाहेबांचा फोटो फाडल्याने ठाकरे गट आक्रमक; किशोरी पेडणेकरांचा शायना एनसींवर घणाघात

‘खाडकन थोबाडीत देऊ, नंतर माफी मागू, असे चालेल का?’; शिवसेना भवन परिसरात आंदोलनाची तयारी

स्मिता कुलकर्णी
स्मिता कुलकर्णी

2 मिनट पठन

किशोरी पेडणेकर
फोटो

मुंबई : शिंदे गटाच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी पत्रकार परिषदेदरम्यान काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडला. मात्र, या फोटोत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो असल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. बाळासाहेबांचा फोटो फाडल्याचा आरोप करत ठाकरे गटाने या प्रकारावर तीव्र आक्षेप घेतला आहे. या घटनेचे राजकीय पडसाद उमटत असून, शायना एनसी यांनी माफी मागितल्यानंतरही ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा कायम आहे. ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शायना एनसी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

किशोरी पेडणेकर यांनी शायना एनसी यांना लक्ष्य करत संतप्त सवाल उपस्थित केला. त्या म्हणाल्या, “शायना एनसी यांना खाडकन थोबाडीत देऊ आणि त्यानंतर आम्ही त्यांची माफी मागू, असे केल्यावर चालेल का? हा आमच्या दैवताचा प्रश्न आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हा विषय आहे. संबंधित पुस्तकात बाळासाहेबांचा कुठेही उल्लेख नाही, तर मग त्यांचा फोटो आणण्याची गरज काय होती? तुम्हाला फोटो फाडायचाच होता, तर संबंधित व्यक्तीचाच फोटो आणायला हवा होता. या शाह सेनेने बाळासाहेबांचा फोटो आणलाच कशाला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, या प्रकरणावरून शायना एनसी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बाळासाहेब ठाकरे हे आपल्यासाठी पितृतुल्य आणि देवतुल्य व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगत त्यांनी आपल्या कृतीचा हेतू बाळासाहेबांचा अनादर करण्याचा नव्हता, असे स्पष्ट केले. त्यांच्या कृतीमुळे शिवसैनिकांच्या किंवा बाळासाहेबांच्या चाहत्यांच्या भावना दुखावल्या असतील, तर मनापासून माफी मागत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मात्र, आपल्या कृतीचा जाणीवपूर्वक विपर्यास करून राजकारण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

शायना एनसी यांच्या माफीनंतरही ठाकरे गटाने या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. बाळासाहेबांचा फोटो फाडल्याच्या निषेधार्थ दादर येथील शिवसेना भवन परिसरात आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवन परिसरात पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या फोटोफाड प्रकरणावरून शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

शेयर करें
स्मिता कुलकर्णी

रिपोर्टर-सबएडिटर

महाराष्ट्र मिरर