पोटच्या दोन मुलांना कालव्यात ढकलले; निर्दयी पिता पोलिसांच्या ताब्यात
चॉकलेट आणि वडापावचे आमिष दाखवून कृत्य; प्रत्यक्षदर्शींना दमदाटी करत दगडफेक
2 मिनट पठन

छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यातील नांदर परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पित्यानेच आपल्या दोन चिमुकल्या मुलांना चॉकलेट आणि वडापावचे आमिष दाखवून जायकवाडीच्या डाव्या कालव्यात ढकलल्याचा आरोप आहे. या घटनेत श्याम आणि आर्यन या दोन्ही भावांचा मृत्यू झाला असून, संशयित पिता सोमनाथ रोडगे याला पाचोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
श्याम सोमनाथ रोडगे (वय ५) आणि आर्यन सोमनाथ रोडगे (वय ७) अशी मृत मुलांची नावे आहेत. तर सोमनाथ दामोधर रोडगे (वय ३२, रा. नांदर, ता. पैठण) असे संशयित पित्याचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास हा प्रकार घडला. सोमनाथ याने दोन्ही मुलांना फिरायला नेण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून जायकवाडीच्या डाव्या कालव्याजवळ नेले. तेथे चॉकलेट आणि वडापाव खाऊ घालण्याचे आमिष दाखवून त्यांना कालव्याच्या पाण्यात ढकलल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
हा प्रकार सुरू असताना काही नागरिकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशयिताने नागरिकांना दमदाटी करत शिवीगाळ केली आणि त्यांच्यावर दगडफेक केल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सोमनाथ रोडगे याला ताब्यात घेतले.
अपघात की घातपात? पोलिसांकडून तपास
दरम्यान, या घटनेबाबत पाचोड पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाठवलेल्या पत्रात वडील शेतातील मोटार सुरू करण्यासाठी गेले असताना मुले कालव्यात वाहून गेल्याचा उल्लेख असल्याची माहिती आहे. त्यामुळे घटनेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. प्रत्यक्षदर्शींचे आरोप आणि अधिकृत पत्रातील उल्लेख यांची पडताळणी पोलीस करत आहेत. कालव्याच्या प्रवाहात मुलांचा शोध घेण्यासाठी पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक ग्रामस्थांनी शोधमोहीम राबवली. या घटनेमुळे नांदर परिसरात शोककळा पसरली आहे.

महाराष्ट्र मिरर
