पुराव्याविना विक्रेत्यांना बांगलादेशी ठरवू नका; अन्यथा गुन्हा दाखल करा
युवक काँग्रेसची पोलीस आयुक्तांकडे तक्रार; भाजप नगरसेवक धीरज घाटे यांच्या वक्तव्यावर आक्षेप
2 मिनट पठन

“लोकशाहीत प्रत्येकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे; मात्र कोणत्याही गरीब कष्टकरी वर्गाला पुराव्याविना देशद्रोही किंवा परदेशी ठरवून द्वेषाचे वातावरण निर्माण करण्याचा अधिकार कोणालाही नाही. हा गांधींचा देश असून येथे भारतप्रेमीच राहतात. कायदा सर्वांसाठी समान असल्याने लोकप्रतिनिधींनी आपल्या वक्तव्यांना पुराव्याची जोड देणे आवश्यक आहे.” - सागर धाडवे (सरचिटणीस, पुणे शहर युवक काँग्रेस)
पुणे: पुणे महानगरपालिकेच्या (मनपा) मुख्य सभेत फर्ग्युसन कॉलेज (ना. गोपाळ कृष्ण गोखले) रस्त्यावरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून भाजप नगरसेवक धीरज घाटे यांनी संबंधित विक्रेते ‘बांगलादेशी नागरिक’ असल्याचा दावा केला होता. या वक्तव्याविरोधात पुणे शहर युवक काँग्रेस आक्रमक झाली असून, “घोषणेचे पुरावे सादर करा, अन्यथा द्वेष पसरवल्याप्रकरणी घाटे यांच्यावर गुन्हा दाखल करा,” अशी मागणी करणारे निवेदन युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांना दिले आहे.
महानगरपालिकेच्या मुख्य सभेत अतिक्रमणावर चर्चा सुरू असताना घाटे यांनी विक्रेत्यांबाबत हे वक्तव्य केले होते. मात्र, या दाव्याच्या समर्थनार्थ कोणताही ठोस पुरावा त्यांनी सभागृहात सादर केलेला नाही. याची गंभीर दखल घेत युवक काँग्रेसचे सरचिटणीस सागर धाडवे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन अधिकृत तक्रार नोंदवली.
या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित विक्रेते बांगलादेशी नागरिक असल्याचे पुरावे असल्यास ते त्वरित सादर करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. परंतु, कोणताही आधार नसताना केवळ गरीब आणि कष्टकरी विक्रेत्यांना परदेशी ठरवून समाजात द्वेष व तेढ निर्माण करणाऱ्या घाटे यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा. तसेच, महापालिकेच्या मुख्य सभेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग व इतिवृत्त तपासून संबंधित वक्तव्याची नोंद तपासणी अहवालात घ्यावी आणि या प्रकरणी केलेल्या कारवाईची माहिती लेखी स्वरूपात कळवावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष किशोर मारणे, युवक काँग्रेसचे सरचिटणीस हर्षद हांडे, यश कोलते, मंथन सपकाळ, हर्ष बिहाणी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper
