पुण्यात एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय तूर्त लांबणीवर
गुरुवारपासून पुन्हा साप्ताहिक पाणीकपात लागू
2 मिनट पठन

पुणे : पुणे शहरावर घोंघावणारे एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे संकट तूर्त टळले असून, आगामी काळात दर गुरुवारीच संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे पुणे महापालिकेने अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर तात्पुरती स्थगित केलेली साप्ताहिक पाणीकपात उद्या, गुरुवारपासून (दि. १९ नोव्हेंबर) पुन्हा एकदा पूर्ववत सुरू होणार आहे.
शहरातील धरणांचा घटता पाणीसाठा आणि जलसंपदा विभागाने दिलेले कपातीचे निर्देश लक्षात घेता, महापालिकेतर्फे एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू होता. या संदर्भात महापालिकेतील सर्व पक्षनेत्यांच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार होता. मात्र, ही नियोजित बैठक होऊ न शकल्याने दिवसाआड पाणीकपातीचा निर्णय अद्याप प्रलंबित राहिला आहे.
जोपर्यंत लोकप्रतिनिधी आणि महापौरांच्या पातळीवर याबाबत अंतिम शिक्कामोर्तब होत नाही, तोपर्यंत शहरात कोणतीही अतिरिक्त पाणीकपात लागू केली जाणार नाही, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. दरम्यान, दिवाळी सणानिमित्त नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने गुरुवारचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय तात्पुरता मागे घेतला होता. आता सण संपल्यामुळे येत्या गुरुवारपासून (दि. १९) पुन्हा आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा बंदचे वेळापत्रक काटेकोरपणे राबवले जाणार आहे.
यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आणि 'एल निनो'च्या संभाव्य प्रभावामुळे आगामी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खडकवासला साखळीतील धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा कमी असल्याने उपलब्ध पाणी पुढील वर्षीच्या पावसाळ्यापर्यंत, म्हणजेच ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत काटकसरीने पुरवण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना पाणीवापरात कपात करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या निर्देशांची अंमलबजावणी करत महापालिकेने गेल्या १५ ऑक्टोबरपासून दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता अधिक पाणीकोटा मिळावा यासाठी महापालिका राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
एकीकडे पाणीटंचाईचे कारण पुढे करत नागरिकांवर साप्ताहिक पाणीकपात लादली जात असताना, दुसरीकडे पाण्याची नासाडी, अनधिकृत नळजोडण्यांद्वारे होणारी पाणीचोरी आणि जलवाहिन्यांमधील गळती रोखण्यासाठी जाहीर केलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात महापालिकेला अपयश आल्याची टीका होत आहे. याशिवाय, समाविष्ट गावांमध्ये आणि शहराच्या काही भागांत गुरुवारच्या पाणीबंदीनंतर शुक्रवारचा पाणीपुरवठाही अत्यंत कमी दाबाने होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांवर एक दिवसाआड पाणीकपातीचा अतिरिक्त बोजा टाकण्याऐवजी आधी पाणीगळती आणि अपव्यय टाळावा, अशी आग्रही मागणी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून केली जात आहे.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper
