पुण्यात उद्या पल्स पोलिओ मोहीम; ३.१६ लाख बालकांना डोस देणार
चार लाख लसींचा साठा सज्ज; शहरात १,३६७ लसीकरण केंद्रांची व्यवस्था
1 मिनट पठन

पुणे, दि. २१ : बालकांचे पोलिओपासून संरक्षण करण्यासाठी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत रविवारी (दि. २२) उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत शहरातील पाच वर्षांखालील तीन लाख १६ हजार २७५ बालकांना पोलिओचा डोस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी महापालिकेकडे चार लाख लसींचा साठा उपलब्ध असून, शहरात एक हजार ३६७ लसीकरण केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
मोहिमेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. सर्व लसीकरण केंद्रांवर पोलिओ लसींसह आवश्यक साहित्याचा पुरवठा करण्यात आला आहे. एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील बालकांनाही त्यांच्या पूर्वीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत डोस दिला जाणार आहे.
लसीकरणासाठी ट्रान्झिट टीम आणि नाइट टीम तैनात करण्यात येणार आहेत. प्रवासात असणाऱ्या तसेच नियमित लसीकरण केंद्रावर येऊ न शकणाऱ्या बालकांना या पथकांमार्फत डोस देण्यात येईल. त्यामुळे बसस्थानके, रेल्वेस्थानके आणि अन्य गर्दीच्या ठिकाणीही लसीकरणावर भर दिला जाणार आहे.
रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत लसीकरण सुरू राहणार आहे. पालकांनी आपल्या पाच वर्षांखालील बालकांना जवळच्या केंद्रावर नेऊन पोलिओचा डोस द्यावा, असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे यांनी केले. सहायक आरोग्य अधिकारी डॉ. विद्या नागमोडे यांनी मोहिमेची माहिती दिली.

महाराष्ट्र मिरर
