पुण्यात अनधिकृत होर्डिंग्जविरोधात कारवाईचा फार्स; सात महिन्यांत केवळ ७८ फलक जमीनदोस्त
महापालिकेच्या १५ पैकी ७ क्षेत्रीय कार्यालयांची कामगिरी ‘शून्य’; नगर रोड विभागाची सर्वाधिक २२ होर्डिंग्जवर कारवाई, तर लहान बॅनर-पोस्टरवर कारवाईचा धडाका
3 मिनट पठन

पुणे : शहरातील मुख्य चौक, वर्दळीचे रस्ते आणि इमारतींच्या छतांवर अनधिकृत होर्डिंग्जचे (जाहिरात फलक) पेव फुटले असताना, पुणे महापालिका प्रशासनाकडून या बेकायदा फलकांवर ठोस कारवाई करण्याऐवजी केवळ दिखावा केला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्या सात महिन्यांत (१ एप्रिल ते ४ नोव्हेंबर २०२६) महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने संपूर्ण शहरात केवळ ७८ अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांपैकी तब्बल सात क्षेत्रीय कार्यालयांनी या कालावधीत एकाही अनधिकृत होर्डिंगवर कारवाई केलेली नसून, त्यांची कामगिरी 'शून्य' राहिली आहे. एकीकडे हजारो लहान बॅनर आणि पोस्टर हटवल्याचा दावा करणाऱ्या प्रशासनाचे बड्या आणि बेकायदा होर्डिंगमालकांपुढे हात टेकले आहेत का, असा संतप्त सवाल पुणेकरांकडून उपस्थित केला जात आहे.
सात क्षेत्रीय कार्यालयांकडून अनधिकृत होर्डिंग्जना अभय?
महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, १ एप्रिल ते ४ नोव्हेंबर २०२६ या सात महिन्यांच्या कालावधीत शहरातील विद्रुपीकरण करणाऱ्या होर्डिंग्जवर अत्यंत संथगतीने कारवाई झाली आहे. यामध्ये नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाने सर्वाधिक २२ अनधिकृत होर्डिंग्ज जमीनदोस्त करून आघाडी घेतली आहे. त्याखालोखाल ढोले पाटील आणि कोंढवा-येवलेवाडी (कोंढवा-उंड्री) क्षेत्रीय कार्यालयाने प्रत्येकी ५ होर्डिंग्जवर कारवाई केली आहे. औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाने ३, तर बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाने केवळ १ होर्डिंग हटवले आहे.
याउलट, शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आणि गजबजलेल्या भागांचा समावेश असलेल्या सात क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत एकही अनधिकृत होर्डिंग पाडण्यात आलेले नाही. यामध्ये शिवाजीनगर-घोले रोड, कोथरूड-बावधन, धनकवडी-कात्रज-आंबेगाव, सिंहगड रोड, वारजे-कर्वेनगर, विश्रामबागवाडा आणि कसबा-भवानी पेठ या सात क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश आहे. या परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदा जाहिरात फलक झळकत असतानाही स्थानिक अधिकाऱ्यांनी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
लहान बॅनरवर धडाका, बड्या होर्डिंग्जवर मेहरबानी
या सात महिन्यांच्या कालावधीत महापालिकेने अनधिकृत जाहिरात साहित्यावर केलेल्या कारवाईची तुलनात्मक आकडेवारी पाहता प्रशासनाची दुटप्पी भूमिका उघड होते. या काळात महापालिकेने शहरातील तब्बल १५ हजार ४६४ अनधिकृत बॅनर, ५ हजार ८५३ पोस्टर, ३ हजार ३२३ विविध झेंडे, ३ हजार २८४ किऑक्स आणि १९२ फ्लेक्स बोर्ड हटवले आहेत. लहान व्यावसायिक, स्थानिक कार्यकर्ते किंवा संस्थांनी लावलेले बॅनर व पोस्टर तातडीने काढून टाकणारी यंत्रणा लोखंडी सांगाडे उभारून उभे केलेल्या महाकाय अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करताना मात्र सुस्त का पडते, असा प्रश्न नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी विचारला आहे.
नियमांची पायमल्ली आणि सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
पुणे महापालिकेच्या नियमावलीनुसार, शहरात कोणतेही होर्डिंग उभारण्यापूर्वी आकाशचिन्ह व परवाना विभागाची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच, राज्य सरकारने निश्चित केलेल्या आकारमान आणि सुरक्षिततेच्या निकषांचे पालन करणे, होर्डिंगवर महापालिकेचा अधिकृत परवाना क्रमांक आणि संबंधित जाहिरात एजन्सीचे नाव ठळकपणे प्रदर्शित करणे आणि दरवर्षी परवान्याचे नूतनीकरण करणे अनिवार्य आहे.
प्रत्यक्षात मात्र, अनेक ठिकाणी कोणतीही परवानगी न घेता किंवा परवान्याची मुदत संपल्यानंतरही नियमबाह्य पद्धतीने होर्डिंग्ज उभारली जात आहेत. अनेक फलकांवर परवाना क्रमांकच नसल्याचे दिसून येते. या बेकायदा होर्डिंग्जमुळे शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचून विद्रुपीकरण तर होतच आहे, शिवाय वादळी वारे किंवा पावसाच्या काळात कमकुवत सांगाड्यांचे होर्डिंग्ज कोसळून जीवितहानी होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
देखरेख यंत्रणेतील त्रुटी उघड
शहरातील अनधिकृत होर्डिंग्जवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आकाशचिन्ह विभागाबरोबरच संबंधित क्षेत्रीय कार्यालयांचीही आहे. मात्र, सात क्षेत्रीय कार्यालयांची शून्य कामगिरी पाहता महापालिकेच्या देखरेख आणि अंमलबजावणी यंत्रणेत गंभीर त्रुटी असल्याचे समोर आले आहे. महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या आणि नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या अनधिकृत होर्डिंग्जविरोधात आयुक्त आणि वरिष्ठ अधिकारी आता संबंधित क्षेत्रीय कार्यालयांना जाब विचारून विशेष मोहीम हाती घेणार का, याकडे संपूर्ण पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper
