मुख्य सामग्री पर जाएँ

पुण्यातील प्रसिद्ध ‘वैशाली’ आणि ‘रूपाली’वर एफडीएची कारवाई

अन्न विक्रीचे परवाने निलंबित; स्वयंपाकघरातील अस्वच्छता, अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक आणि स्वच्छतागृहाजवळच अन्न तयार करण्यासारख्या गंभीर त्रुटी

विक्रांत कुलकर्णी
विक्रांत कुलकर्णी

2 मिनट पठन

पुण्यातील प्रसिद्ध ‘वैशाली’ आणि ‘रूपाली’वर एफडीएची कारवाई
अन्न विक्रीचे परवाने निलंबित; स्वयंपाकघरातील अस्वच्छता, अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक आणि स्वच्छतागृहाजवळच अन्न तयार करण्यासारख्या गंभीर त्रुटी

पुणे: पुण्यातील खवय्यांसाठी एफ.सी. रोडवरील वैशाली आणि रूपाली ही नावं काही नवीन नाहीत. अनेक वर्षांपासून पुणेकरांच्या पसंतीला उतरलेल्या या दोन्ही प्रसिद्ध रेस्टॉरंटबाबत आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वैशाली किंवा रूपालीमध्ये खाण्याचा बेत असेल तर थांबा! कारण पुणेकरांच्या विशेष पसंतीची असलेल्या या दोन्ही प्रसिद्ध रेस्टॉरंटवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे.

स्वयंपाकघरातील अस्वच्छता, अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक आणि स्वच्छतागृहाजवळच अन्न तयार करण्यासारख्या गंभीर त्रुटी समोर आल्यानंतर प्रशासनाने दोन्ही हॉटेलचे अन्न व्यवसाय परवाने तात्काळ निलंबित केले आहेत.

‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, पुढील आदेश मिळेपर्यंत या दोन्ही आस्थापनांना अन्नपदार्थांची विक्री किंवा पार्सल सेवा सुरू ठेवता येणार नाही.

वैशालीच्या स्वयंपाकघरात स्वच्छतागृहाजवळच अन्नाची तयारी

एफ.सी. रोडवरील हॉटेल वैशालीमध्ये १३ नोव्हेंबर रोजी तपासणी करण्यात आली. या तपासणीत ९८ पैकी केवळ ५८ गुण मिळाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, स्वयंपाकघरातील जागेच्या अभावामुळे अन्नसुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आले. कच्चा माल ठेवण्यासाठीचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाशेजारी, तर डोसा आणि उत्तप्पा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ ठेवण्यात आला होता. धुतलेली भांडीही स्वच्छतागृहासमोरील टेबलावर उघड्यावर ठेवण्यात आली होती.

इतकंच नाही, तर उकडलेले बटाटे, शिजवलेला भात आणि इतर तयार अन्नपदार्थ कॉरिडॉरमध्ये उघड्यावर ठेवलेले आढळले. कच्च्या भाज्या तयार अन्नाच्या वर ठेवल्याने अन्न दूषित होण्याचा धोकाही निर्माण झाला होता. याशिवाय कीटकप्रतिबंधक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याच्या चाचणीचा अद्ययावत अहवाल आणि प्रशिक्षित पर्यवेक्षकाच्या उपस्थितीबाबतही त्रुटी आढळल्या. यापूर्वी जूनमध्ये सुधारणा करण्याची नोटीस देऊनही पुन्हा गंभीर त्रुटी आढळल्याने वैशालीचा परवाना निलंबित करण्यात आला.

रूपाली रेस्टॉरंटमध्येही अस्वच्छतेचा प्रकार

दुसरीकडे, रूपाली रेस्टॉरंटच्या तपासणीतही अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन होत नसल्याचे समोर आले. येथील स्वयंपाकघर उघड्या अवस्थेत असल्याने धूळ, घाण आणि कीटकांचा अन्नपदार्थांशी संपर्क येण्याची शक्यता होती. परिसरात पाणी साचलेले होते, साफसफाई व्यवस्थित नव्हती आणि कचऱ्याचे व्यवस्थापनही योग्य पद्धतीने केले जात नसल्याचे तपासणीत आढळले.

अन्नपदार्थ झाकून न ठेवणे, त्यावर आवश्यक लेबलिंग नसणे तसेच वापरण्याची अंतिम तारीख म्हणजेच 'युज बाय' तारीख नमूद नसणे, अशा त्रुटीही समोर आल्या. विशेष म्हणजे, अन्नपदार्थांचे तापमान नियंत्रित ठेवण्याच्या नोंदी, अन्नसुरक्षा व्यवस्थापन आराखडा आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासंबंधी आवश्यक कागदपत्रांचाही अभाव आढळला.

एफडीएचा स्पष्ट इशारा

सहायक आयुक्त (अन्न) सय्यद इम्रान हाश्मी यांच्या आदेशानुसार दोन्ही रेस्टॉरंटचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. सहआयुक्त श्रीकांत आर. करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. संबंधित आस्थापनांनी सर्व त्रुटी दूर करून पुन्हा तपासणीत पात्र ठरणे आणि प्रशासनाची लेखी परवानगी मिळवणे आवश्यक आहे. तोपर्यंत अन्नपदार्थांची विक्री किंवा पार्सल सेवा सुरू करता येणार नाही. नियमांचे उल्लंघन करून व्यवसाय सुरू ठेवल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही एफडीएने दिला आहे.

शेयर करें
विक्रांत कुलकर्णी

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper