मुख्य सामग्री पर जाएँ

पुण्याचं नाव बदलणार? 'फुलेनगर'ची मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे

‘राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा’च्या शिष्टमंडळाने नुकतीच नागपूर येथे फडणवीस यांची भेट घेऊन दिले निवेदन

वक
विक्रांत कुलकर्णी

4 मिनट पठन

पुण्याचं नाव बदलणार? 'फुलेनगर'ची मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे
‘राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा’च्या शिष्टमंडळाने नुकतीच नागपूर येथे फडणवीस यांची भेट घेऊन दिले निवेदन

‘राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा’च्या शिष्टमंडळाने नुकतीच नागपूर येथे फडणवीस यांची भेट घेऊन दिले निवेदन

संघटनेच्या मागण्या

*थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांच्या जन्माला २०० वर्षे पूर्ण होत आहेत

*या ऐतिहासिक द्विशताब्दी वर्षाचे औचित्य साधून पुण्याचे नामांतर करावे

*महात्मा फुले यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान बहाल करावा

*फुलेंनी शहराला ‘विद्येचे माहेरघर’ ही खरी ओळख दिली, त्यांचे नाव या शहराला देणे ही काळाची गरज

पुणे, धनश्री ओतारी

महाराष्ट्राची सांस्कृतिक, शैक्षणिक आणि ऐतिहासिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहराची ओळख बदलून त्याचे नामकरण ‘फुलेनगर’ करावे, या मागणीने आता जोर धरला आहे. ‘राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा’च्या शिष्टमंडळाने नुकतीच नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन यासंदर्भात अधिकृत निवेदन सादर केले.

सन २०२७ मध्ये थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांच्या जन्माला २०० वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक द्विशताब्दी वर्षाचे औचित्य साधून पुण्याचे नामांतर करावे आणि महात्मा फुले यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान बहाल करावा, अशी आग्रही भूमिका संघटनेने मांडली आहे.

भारतीय समाजसुधारणा चळवळीचे ते मुख्य केंद्र

पुणे शहर हे केवळ पेशव्यांची राजधानी किंवा आयटी हब म्हणून ओळखले जात नाही, तर भारतीय समाजसुधारणा चळवळीचे ते मुख्य केंद्र राहिले आहे. याच भूमीत महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये भिडे वाडा येथे देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करून स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. सत्यशोधक समाजाची स्थापना करून बहुजन समाजाला गुलामगिरीतून मुक्त करण्याचा लढाही याच शहरातून उभारला गेला.

शहराला ‘विद्येचे माहेरघर’ ही खरी ओळख दिली

निवेदन दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “पुणे ही महात्मा फुले यांची कर्मभूमी आहे. ज्या महापुरुषाने या शहराला ‘विद्येचे माहेरघर’ ही खरी ओळख दिली, त्यांचे नाव या शहराला देणे ही काळाची गरज आहे. २०२७ हे त्यांच्या जन्माचे द्विशताब्दी वर्ष आहे. त्यापूर्वी सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतल्यास जगभरात सामाजिक समतेचा एक मोठा संदेश जाईल.”

राज्य सरकारकडे सात कलमी कार्यक्रम सादर

केवळ शहराचे नाव बदलण्यापुरते मर्यादित न राहता, महात्मा फुले यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचावेत यासाठी मोर्चाने राज्य सरकारकडे सात कलमी कार्यक्रम सादर केला आहे. महात्मा जोतिराव फुले यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि पुणे शहराचे नामांतर ‘फुलेनगर’ करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र विधिमंडळाचे एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलवावे. महात्मा फुले यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाने तातडीने ठराव मंजूर करून तो केंद्र सरकारकडे पाठवावा.

दरवर्षी ११ एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा आणि ग्रामपंचायतींमध्ये विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्याचे बंधनकारक करावे. राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत आणि नगरपालिका वाचनालयात महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले महात्मा फुले यांचे ‘समग्र वाङ्मय’ उपलब्ध करून द्यावे.

ग्रामीण आणि शहरी भागातील ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती असेल, त्या शाळांना आणि शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय ‘महात्मा फुले गुरुवर्य पुरस्कार’ सुरू करावा.

राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर संशोधन करण्यासाठी स्वतंत्र अध्यासन केंद्रे स्थापन करावीत आणि त्यासाठी भरीव निधीची तरतूद करावी. स्त्रीशिक्षणाचे उगमस्थान असलेल्या भिडे वाडा येथील राष्ट्रीय स्मारकाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून ते २०२७ पूर्वी जनतेसाठी खुले करावे.

सरकारची कोंडी होण्याची शक्यता

महाराष्ट्रात शहरांच्या नामांतराचा मुद्दा नेहमीच संवेदनशील आणि राजकीयदृष्ट्या निर्णायक राहिला आहे. यापूर्वी महायुती सरकारने औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि अहमदनगरचे ‘अहिल्यानगर’ असे नामांतर करून आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यामुळे आता पुण्याच्या नामांतराची मागणी पुढे आल्याने सरकारची कोंडी होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत.

यापूर्वीही पुण्याचे नाव बदलण्याबाबत वेगवेगळे प्रस्ताव पुढे आले आहेत. काही वर्षांपूर्वी संभाजी ब्रिगेडसह विविध मराठा संघटनांनी राजमाता जिजाऊ यांच्या सन्मानार्थ पुण्याचे नाव ‘जिजापूर’ किंवा ‘जिजाऊनगर’ करण्याची मागणी केली होती. तर काही हिंदुत्ववादी संघटनांनी ‘पुण्यनगरी’ या नावाचा आग्रह धरला होता. दुसरीकडे, पुण्यातील इतिहासप्रेमी, नागरिक आणि आयटी क्षेत्रातील तरुणाईच्या एका मोठ्या वर्गाचा शहराचे ऐतिहासिक नाव बदलण्यास विरोध राहिला आहे. ‘पुणे’ या नावाशी शतकानुशतकांची सांस्कृतिक आणि जागतिक ओळख जोडलेली असल्याने नाव बदलून नेमके काय साध्य होणार, असा प्रश्नही नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

ओबीसी मतपेढीला आकर्षित करण्यासाठी हा मुद्दा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी मोर्चाच्या शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेत निवेदन स्वीकारले असले, तरी अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि २०२७ मधील फुले द्विशताब्दी सोहळा लक्षात घेता, ओबीसी मतपेढीला आकर्षित करण्यासाठी हा मुद्दा तापण्याची चिन्हे आहेत. येत्या काही दिवसांत राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाच्या वतीने पुणे आणि राज्यभरात जनजागृती मोहीम आणि मोर्चे काढण्याचे नियोजन करण्यात आले असून, यावर सत्ताधारी आणि विरोधक काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

शेयर करें