पुणे महापालिकेत नोकरीचे आमिष दाखवून सव्वा कोटींची फसवणूक; १ कोटी ३७ लाखांचा गंडा!
विजेंद्र पवारविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचा दावा करून बनावट नियुक्तीपत्रे दिल्याचा आरोप
2 मिनट पठन

पुणे, महाराष्ट्र मिरर : सरकारी नोकरी मिळवण्याच्या आशेने प्रयत्न करणाऱ्या बेरोजगार तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचे प्रकार सातत्याने समोर येत असतानाच पुणे महानगरपालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तब्बल १ कोटी ३७ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विजेंद्र हनुमंत पवार (वय ३८) याच्याविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांत दाखल झालेल्या एफआयआरनुसार, आरोपी विजेंद्र पवार याने पुणे महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपली ओळख असल्याचे सांगून संबंधितांना महापालिकेत नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप आहे. सरकारी नोकरीची संधी मिळणार असल्याच्या विश्वासातून तक्रारदारांनी आरोपीकडे पैसे दिले. मात्र, नोकरी मिळवून देण्याऐवजी आरोपीने त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात आरोपी विजेंद्र पवार याने पीडितांचा विश्वास संपादन करण्यासाठी बनावट नियुक्तीपत्रांचा वापर केल्याचाही आरोप आहे. महापालिकेत नोकरी लागल्याचे भासवून संबंधितांची दिशाभूल करण्यात आल्याचे प्राथमिक तक्रारीतून समोर आले आहे. या माध्यमातून एकूण १ कोटी ३७ लाख ४४ हजार रुपयांची रक्कम उकळण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी विजेंद्र पवार याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, फसवणुकीच्या या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे. आरोपीने आणखी किती जणांना नोकरीचे आमिष दाखवले, बनावट नियुक्तीपत्रे किती जणांना दिली आणि फसवणुकीची रक्कम नेमकी कुठे वापरली, याचा तपासातून उलगडा होण्याची शक्यता आहे.
सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अनेक बेरोजगार तरुण आणि त्यांचे कुटुंबीय वर्षानुवर्षे प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत ओळखीच्या माध्यमातून नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देणाऱ्या व्यक्तींवर विश्वास ठेवून अनेक जण मोठ्या रकमा देतात. मात्र, अशा आमिषांचा फायदा घेत काही भामटे बेरोजगारांच्या स्वप्नांशी खेळत असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper
