मुख्य सामग्री पर जाएँ

पुणे महापालिकेचा अजब कारभार ; करदात्यांच्या पैशाच्या अपव्ययाचा आरोप

कोथरूडमध्ये सुस्थितीत असलेल्या सिमेंट रस्त्यावर डांबरीकरण

विक्रांत कुलकर्णी
विक्रांत कुलकर्णी

2 मिनट पठन

पुणे महापालिकेचा अजब कारभार
कोथरूडमध्ये सुस्थितीत असलेल्या सिमेंट रस्त्यावर डांबरीकरण

पुणे, महाराष्ट्र मिरर : कोथरूड परिसरातील सुस्थितीत असलेल्या सिमेंटच्या रस्त्यावर थेट डांबरीकरण करण्यात आल्याचा प्रकार स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला आहे. आशिष गार्डन रस्ता आणि वनाज कंपनी परिसरातील सिमेंट रस्त्यावर डांबराचा थर चढवण्यात आल्याने करदात्यांच्या पैशाचा अपव्यय झाल्याचा आरोप होत असून, यावरून परिसरात नाराजी व्यक्त केली जात आहे.

कोथरूडमधील रस्ते विकासाच्या कामांबाबत नागरिकांमध्ये आधीच विविध प्रश्नांवर चर्चा सुरू आहे. अशातच वापरण्यायोग्य आणि चांगल्या स्थितीत असलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर पुन्हा डांबरीकरण का करण्यात आले, असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. रस्ते कामांच्या नियोजनात समन्वयाचा अभाव असल्याचा आक्षेपही नागरिकांनी नोंदवला आहे.

या प्रकारावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून स्थानिक सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब विचारे यांनी सार्वजनिक निधीच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "रस्ते निर्मितीत होणारा भ्रष्टाचार कमी व्हावा म्हणून सरकारने पर्यावरणाची काळजी न करता देशभरात सिमेंटचे रस्ते बांधले; पण पुणे महापालिकेने त्याच सिमेंटच्या रस्त्यांवर डांबरीकरण का केले, हा प्रश्न आम्हाला पडतो आहे. हा सर्वसामान्य नागरिकांच्या पैशांचा चुराडा आहे," असे त्यांनी म्हटले आहे.

आंदोलनाचा इशारा

या कामाची जबाबदारी आणि कंत्राटदाराची माहिती जाहीर करण्याची मागणी करत रोहित मारणे यांनी प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे. "रस्ते बांधणे हे हल्ली भ्रष्टाचाराचं कुरण झालं आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात तात्काळ खुलासा करावा आणि हे काम करणाऱ्या कंत्राटदारांची माहिती सार्वजनिकरित्या जाहीर करावी; अन्यथा कोथरूडकर महापालिकेच्या या भोंगळ कारभाराविरोधात तीव्र निषेध आंदोलन करतील," असा इशारा त्यांनी दिला आहे.

सिमेंट रस्त्यावर डांबरीकरण करण्यामागे तांत्रिक कारण आहे की नियोजनातील त्रुटी, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही. या प्रकरणावर कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालय तसेच पुणे महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी काय खुलासा देतात आणि या कामाची चौकशी होते का, याकडे कोथरूडकरांचे लक्ष लागले आहे.

शेयर करें
विक्रांत कुलकर्णी

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper