पुढील तीन वर्षांत एआय मानवांवर मिळवू शकते वर्चस्व; जेफ्री हिंटन यांचा गंभीर इशारा
सुपर इंटेलिजंट एआयमुळे मानवी स्वातंत्र्य धोक्यात येण्याची भीती; तंत्रज्ञानावरील नियंत्रण सुटण्याची शक्यता
2 मिनट पठन

टोरंटो, वृत्तसंस्था : कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा वेगाने होणारा विकास भविष्यात मानवजातीसाठी मोठे संकट ठरू शकतो, असा गंभीर इशारा नोबेल पुरस्कार विजेते आणि ‘एआयचे गॉडफादर’ म्हणून ओळखले जाणारे प्रा. जेफ्री हिंटन यांनी दिला आहे. पुढील तीन वर्षांत एआय मानवांवर वर्चस्व निर्माण करू शकते. विशेषतः सुपर इंटेलिजंट एआय विकसित झाल्यास माणसांऐवजी कृत्रिम बुद्धिमत्ताच मानवांवर नियंत्रण ठेवण्याची शक्यता असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे भविष्यात मानवी स्वातंत्र्य आणि अस्तित्वासमोर मोठे आव्हान निर्माण होऊ शकते.
टोरंटो येथे झालेल्या एआय सुरक्षा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या बैठकीत हिंटन यांनी या संभाव्य धोक्यांकडे लक्ष वेधले. एआय प्रणालीची बुद्धिमत्ता मानवी बुद्धिमत्तेपेक्षा अधिक होण्याचा धोका आपण गांभीर्याने घ्यायला हवा, असे त्यांनी सांगितले. यापूर्वी एआय मानवांपेक्षा अधिक बुद्धिमान होण्यासाठी किमान दहा वर्षांचा कालावधी लागेल, असा अंदाज होता. मात्र, आता हे बदल अपेक्षेपेक्षा खूप लवकर घडू शकतात. पुढील १८ महिन्यांतच एआय मानवी बुद्धिमत्तेला मागे टाकण्याच्या दिशेने मोठी झेप घेऊ शकते, अशी भीती हिंटन यांनी व्यक्त केली. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, अलाइनमेंट रिसर्च सेंटरचे संस्थापक पॉल क्रिस्टियानो यांनीही एआयच्या भविष्यातील धोक्यांबाबत गंभीर इशारा दिला आहे. त्यांच्या मते, पुढील सहा ते बारा महिन्यांत एआय प्रणाली मानवांच्या नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. तर पुढील तीन वर्षांत एआय मानवांवर वर्चस्व निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. एआयच्या चुकीच्या वापरामुळे किंवा नियंत्रणाबाहेर गेलेल्या प्रणालीमुळे मोठी दुर्घटना घडून अनेकांचे जीव धोक्यात येऊ शकतात, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
क्रिस्टियानो यांनी एआयवरील मानवी नियंत्रण सुटण्याबाबत काही अंदाजही मांडले आहेत. त्यांच्या मते, पुढील एका वर्षात मानवांचा एआयवरील ताबा कायमचा सुटण्याची शक्यता चार टक्के आहे. तर पुढील तीन वर्षांत ही शक्यता १५ टक्क्यांपर्यंत जाऊ शकते. टोरंटो येथील व्याख्यानात त्यांनी एआयच्या वाढत्या क्षमतेसोबतच त्याच्या संभाव्य दुष्परिणामांवरही प्रकाश टाकला.
सध्या शिक्षण, आरोग्य, उद्योग, संरक्षण, संशोधन आणि दैनंदिन व्यवहार अशा अनेक क्षेत्रांत एआयचा वापर वाढत आहे. अनेक कामे वेगाने आणि अचूकपणे करण्याची क्षमता या तंत्रज्ञानात आहे. मात्र, एआयला अधिकाधिक स्वायत्त निर्णय घेण्याची क्षमता मिळाल्यास त्यावर मानवी नियंत्रण कसे कायम ठेवायचे, हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे एआयचा विकास थांबवण्यापेक्षा त्यासाठी योग्य सुरक्षा नियम, नियंत्रण व्यवस्था आणि जबाबदारी निश्चित करणे आवश्यक असल्याची चर्चा तज्ज्ञांमध्ये सुरू आहे.
एआयमुळे मानवाचे जीवन अधिक सोपे होणार की भविष्यात हेच तंत्रज्ञान मानवासाठी आव्हान ठरणार, हा प्रश्न आता अधिक गंभीर बनला आहे.

महाराष्ट्र मिरर
