मुख्य सामग्री पर जाएँ

न्यायालयातील गोळीबारानंतर सुरक्षा व्यवस्थेचा आढावा

प्रधान जिल्हा न्यायाधीशांकडून पोलीस आयुक्तांना पाचारण प्रवेशद्वारांवरील तपासणी आणि पोलीस बंदोबस्त वाढविण्यावर भर

स्मिता कुलकर्णी
स्मिता कुलकर्णी

2 मिनट पठन

जिल्हा व सत्र न्यायालय

पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात बुधवारी भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर न्यायालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांनी गुरुवारी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पाचारण करून उच्चस्तरीय बैठक घेतली. न्यायालयाच्या आवारातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी या बैठकीत विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

या बैठकीला वरिष्ठ न्यायिक अधिकारी, पुणे बार असोसिएशनचे प्रतिनिधी आणि न्यायालयीन प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. न्यायालयात प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या व्यक्तींची तपासणी, वाहनांची कसून तपासणी, अतिरिक्त पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही यंत्रणेचे बळकटीकरण आणि वाहनतळाची व्यवस्था सुधारणे, अशा महत्त्वाच्या मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला.

न्यायालयाच्या आवारात दररोज मोठ्या संख्येने वकील, पक्षकार, साक्षीदार आणि नागरिकांची ये-जा असते. अशा संवेदनशील ठिकाणी बुधवारी घडलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

३२ सीसीटीव्ही कॅमेरे; काही बंद अवस्थेत

न्यायालयाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेताना सीसीटीव्ही यंत्रणेतील त्रुटी समोर आल्या. सध्या न्यायालयाच्या परिसरात एकूण ३२ सीसीटीव्ही कॅमेरे असल्याची माहिती समोर आली असून, त्यापैकी काही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. हे कॅमेरे तातडीने दुरुस्त करून पुन्हा सुरू करण्याबरोबरच अतिरिक्त कॅमेरे बसविण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.

बुधवारी गोळीबाराची घटना घडलेल्या ठिकाणीही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. न्यायालयाच्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या भागावर लक्ष ठेवता यावे, यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला.

वाहनांची कसून तपासणी; प्रवेशद्वारांवर बंदोबस्त वाढणार

न्यायालयाच्या प्रवेशद्वारांजवळ होणारी वाहनांची गर्दी आणि अनधिकृत वाहनांची ये-जा रोखण्यासाठी वाहनतळाची व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला. न्यायालयाच्या आवारात प्रवेश करणाऱ्या वाहनांची काटेकोर तपासणी, प्रवेशद्वारांवर अतिरिक्त पोलीस तैनात करणे आणि संवेदनशील ठिकाणी बॅरिकेडिंग करण्याबाबतही चर्चा झाली.

परवानगीशिवाय प्रवेश करणाऱ्या व्यक्ती आणि संशयास्पद वाहनांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. वाहनांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणेचा प्रभावी वापर केला जाणार असून, प्रस्तावित उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी पोलीस आणि न्यायालयीन प्रशासन यांच्यात समन्वय ठेवण्यात येणार आहे.

उपाययोजना युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे पोलीस आयुक्तांचे आश्वासन

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी न्यायालयाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. तपासणीदरम्यान आढळलेल्या बाबी न्यायालयीन प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्याचे त्यांनी सांगितले.

न्यायालयाच्या आवारात सध्या ३२ सीसीटीव्ही कॅमेरे असून, त्यापैकी काही बंद आहेत. ते पुन्हा सुरू करणे आणि अतिरिक्त कॅमेरे बसविणे, वाहनतळाची व्यवस्था सुधारणे तसेच न्यायालयात प्रवेश करणाऱ्या व्यक्ती आणि वाहनांची तपासणी अधिक कडक करणे, या विषयांवर चर्चा झाली आहे. या सर्व उपाययोजना युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले.

बुधवारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर न्यायालयाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे. सीसीटीव्ही यंत्रणेचे बळकटीकरण, प्रवेश नियंत्रण, वाहनांची तपासणी आणि पोलीस बंदोबस्तात वाढ या उपाययोजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेयर करें
स्मिता कुलकर्णी

रिपोर्टर-सबएडिटर

महाराष्ट्र मिरर