मुख्य सामग्री पर जाएँ

निघोजेत कामगाराचे प्रसंगावधान; मोबाईल हिसकावणाऱ्या दोघांपैकी एकाला पकडले

चाकूचा धाक दाखवून कंपनीतील कामगाराचा मोबाईल हिसकावला; दुचाकीची चावी काढून घेतली अन् आरडाओरडा करत स्थानिकांच्या मदतीने आरोपीला पकडले

विक्रांत कुलकर्णी
विक्रांत कुलकर्णी

2 मिनट पठन

निघोजेत कामगाराचे प्रसंगावधान; मोबाईल हिसकावणाऱ्या दोघांपैकी एकाला पकडले
चाकूचा धाक दाखवून कंपनीतील कामगाराचा मोबाईल हिसकावला; दुचाकीची चावी काढून घेतली अन् आरडाओरडा करत स्थानिकांच्या मदतीने आरोपीला पकडले

पिंपरी: खेड तालुक्यातील निघोजे येथे चाकूचा धाक दाखवून मोबाईल हिसकावणाऱ्या दोन लुटारूंपैकी एकाला एका सतर्क कामगाराने प्रसंगावधान राखत पकडले. दुचाकीवरून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींच्या गाडीची चावी फिर्यादीने काढून घेतल्याने त्यांचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला. त्यानंतर आरडाओरडा करून स्थानिकांची मदत घेत या कामगाराने एका आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मनोज शिंदे (वय ३४, रा. देहूगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.

रात्रीच्या शिफ्टसाठी बसची प्रतीक्षा करत असताना हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित २५ वर्षीय तरुण एका वाहननिर्मिती कंपनीत हेल्पर म्हणून काम करतो. बुधवारी रात्री त्याची कामाची शिफ्ट असल्याने तो निघोजे येथे कंपनीच्या बसची वाट पाहत थांबला होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याला गाठले. त्यातील एकाने या कामगाराला पकडून ठेवले, तर दुसऱ्याने चाकूचा धाक दाखवत त्याच्याकडील मोबाईल हिसकावून घेतला.

मोबाईल हिसकल्यानंतर दोघेही दुचाकीवरून पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र, प्रसंगावधान राखत कामगाराने त्यांच्या दुचाकीच्या इग्निशनमधील चावी काढून घेतली. त्यामुळे आरोपींना तातडीने पळून जाता आले नाही.

आरडाओरडा केल्याने स्थानिक धावले मदतीला

कामगाराने आरडाओरडा करून परिसरातील नागरिकांकडे मदत मागितली. त्याचवेळी बसथांब्याकडे येत असलेल्या त्याच्या मित्राने हा प्रकार पाहिला आणि पोलिसांना फोन केला. कामगारासह काही स्थानिकांनी आरोपींचा पाठलाग करून त्यांच्यापैकी एकाला पकडले. दरम्यान, दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मनोज शिंदे याला ताब्यात घेत अटक केली.

दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू

दक्षिण महाळुंगे पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (दरोडा) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील दुसऱ्या आरोपीची ओळख पोलिसांनी पटवली असून, त्याला लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

शेयर करें
विक्रांत कुलकर्णी

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper