नाशिकमधील पाच नामांकित हॉटेल्सवर एफडीएची धडक कारवाई; दुर्गा कॅफेचे नोंदणी प्रमाणपत्र निलंबित, मिसळ हॉटेल्सचीही तपासणी
तुषार मिसळ, विहार, शामसुंदर, दुर्गा कॅफे आणि महाराजा काठियावाडीवर कारवाई; मुदतबाह्य अन्नपदार्थ, किटकांचा प्रादुर्भाव व नियमांचे उल्लंघन उघड
2 मिनट पठन

नाशिक :- अन्न व औषध प्रशासनाने (FDA) नाशिक शहरातील पाच नामांकित हॉटेल्स व मिसळ आस्थापनांवर धडक कारवाई केली आहे. कॉलेज रोडवरील दुर्गा कॅफेचे नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले असून, तुषार मिसळ, हॉटेल विहार, हॉटेल शामसुंदर आणि हॉटेल महाराजा काठियावाडी यांच्यावरही अन्न सुरक्षा व मानक कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
कारवाई करण्यात आलेली आस्थापने आणि आढळलेल्या त्रुटी ; दुर्गा कॅफेच्या बिलावर FSSAI क्रमांक नाही; तुषार मिसळमध्ये मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळले
एफडीएच्या तपासणीत विविध आस्थापनांमध्ये गंभीर त्रुटी व नियमांचे उल्लंघन समोर आले आहे.
दुर्गा कॅफे (कॉलेज रोड): नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले आहे. ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या बिलांवर FSSAI परवाना क्रमांक नमूद नसल्याचे आणि मेन्यू कार्ड किंवा डिस्प्ले एरियामध्ये स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या माध्यमाचा (Cooking Medium) उल्लेख नसल्याचे निदर्शनास आले.
तुषार मिसळ (असवारी चौक): अन्नपदार्थांच्या साठवणुकीसाठी अपुरी जागा आणि मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळून आले.
हॉटेल विहार (जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड): तपासणीदरम्यान अस्वच्छता तसेच अन्न तयार करण्याच्या ठिकाणी कीटक व इतर उपद्रवी जीवांचा प्रादुर्भाव आढळला.
हॉटेल शामसुंदर (सातपूर एमआयडीसी): स्वच्छता आणि अन्न साठवणुकीबाबत गंभीर त्रुटी आढळून आल्या.
हॉटेल महाराजा काठियावाडी (आडगाव फाटा): आस्थापनेत अस्वच्छता, स्टोअर रूममध्ये उंदरांची विष्ठा तसेच अन्न तयार करण्याच्या ठिकाणी धूळ व कीटकांचा प्रवेश रोखण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याचे आढळले.
राज्यभरात एफडीएची मोहीम तीव्र ; तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली कारवाईचा धडाका; पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये मोठी मोहीम
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभरात खाद्य आस्थापनांची तपासणी मोहीम तीव्र करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील प्रसिद्ध वैशाली आणि रूपाली हॉटेलवर कारवाई केल्यानंतर आता नाशिकमधील या कारवाईमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper
