मुख्य सामग्री पर जाएँ

दोन्ही शिवसेना एकत्र येणार? ओमराजे निंबाळकरांनी व्यक्त केली मनातील इच्छा; म्हणाले, 'तर आनंदच होईल!'

राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आला असतानाच आता दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चांनीही जोर धरला आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

2 मिनट पठन

दोन्ही शिवसेना एकत्र येणार?
ओमराजे निंबाळकरांनी व्यक्त केली मनातील इच्छा; म्हणाले, 'तर आनंदच होईल!'

धाराशिव : राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आला असतानाच आता दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चांनीही जोर धरला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास आपल्याला आनंदच होईल, अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

प्रादेशिक पक्षांची ताकद वाढण्यासाठी दोन्ही शिवसेनेने एकत्र यावे, अशी भावना यापूर्वीही दोन्ही पक्षांतील काही नेत्यांनी व्यक्त केली आहे. आता खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही याच भूमिकेला पाठिंबा दिल्याने राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे.

ओमराजे निंबाळकर नेमकं काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांबरोबरच शिवसेनेच्या दोन्ही गटांनी एकत्र येण्याबाबतही ओमराजे निंबाळकर यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना ते म्हणाले की, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर मला आनंदच होईल. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. अशा प्रकारचे निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतले जातात. मात्र, दोन्ही पक्षांनी एकत्र यावे, ही माझी भावना आहे आणि ती मी व्यक्त केली आहे.

ओमराजे यांच्या या विधानामुळे दोन्ही शिवसेनांच्या संभाव्य मनोमीलनाच्या चर्चांना पुन्हा हवा मिळाली आहे. विशेष म्हणजे, दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या भेटीगाठी आणि एकत्र येण्याबाबतची अधूनमधून व्यक्त होणारी भूमिका यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

ठाकरे गट सोडून शिंदे गटात जाण्याचा निर्णय?

ओमराजे निंबाळकर यांची ओळख एकेकाळी उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून होती. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठा कायम ठेवली होती. मात्र, मतदारसंघातील विकासकामे आणि जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सत्ताधारी पक्षासोबत जाण्याची भूमिका त्यांनी घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात झाली.

या निर्णयामुळे त्यांच्याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले गेले. त्यांच्या भूमिकेवर टीकाही झाली. त्यावर प्रतिक्रिया देताना कोणत्याही टीकेला उत्तर देणार नसून काळच त्याचे उत्तर देईल, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.

दरम्यान, ओमराजे निंबाळकर यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत व्यक्त केलेली सकारात्मक भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांच्या या विधानावर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटातील वरिष्ठ नेते काय प्रतिक्रिया देतात, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शेयर करें