जादा भाडे आकारणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सना दणका
प्रादेशिक परिवहन विभागाकडून सुमारे ३३ लाखांचा दंड वसूल
1 मिनट पठन

पुणे, महाराष्ट्र मिरर : सणासुदीच्या आणि प्रवासाच्या गर्दीच्या काळात प्रवाशांची आर्थिक लूट करणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटी) धडक कारवाई केली आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२६ दरम्यान राबवण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत तब्बल ३२ लाख ९४ हजार रुपयांचा दंड व कर वसूल करण्यात आला आहे.
तक्रारींची तात्काळ दखल आणि नोटीस
जादा भाडे आकारणीबाबत प्रवाशांकडून व्हॉट्सॲप आणि ईमेलद्वारे एकूण ४३ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत प्रशासनाने आतापर्यंत २० ट्रॅव्हल्सना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. उर्वरित तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित ट्रॅव्हल एजन्सीची माहिती संकलित करून त्यांनाही नोटीस पाठवण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे.
दोन टप्प्यांतील कारवाईचा आढावा
सप्टेंबर व ऑक्टोबर २०२६ मधील कारवाई
या दोन महिन्यांच्या कालावधीत एकूण ९२९ वाहनांची तपासणी करण्यात आली. यापैकी ३४५ वाहने दोषी आढळली असून, जादा भाडे आकारणाऱ्या ७ वाहनांवर विशेष कारवाई करण्यात आली. या मोहिमेत २५.८२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
नोव्हेंबरमधील विशेष तपासणी मोहीम
०१ नोव्हेंबर २०२६ पासून राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत आतापर्यंत ३८९ वाहनांची तपासणी झाली. त्यातील ७४ वाहने दोषी आढळली, तर जादा भाडे आकारणाऱ्या २३ वाहनांवर कारवाई करत ७.१२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र मिरर
