जागतिक नेमबाजी स्पर्धेत विवान कपूरची रौप्य भरारी; भारताला लॉस एंजेलिस ऑलिम्पिकचा कोटा!
ट्रॅप प्रकारात ऐतिहासिक कामगिरी; कुवेतच्या नेमबाजाकडून शूट-ऑफमध्ये पराभव, भारताला तिसरा ऑलिम्पिक कोटा
2 मिनट पठन

नवी दिल्ली : भारतीय नेमबाज विवान कपूर याने जागतिक नेमबाजी स्पर्धेत (ISSF World Championship) शानदार कामगिरी करत रौप्यपदकाला गवसणी घातली आहे. कतारमधील दोहा येथे झालेल्या पुरुषांच्या ट्रॅप प्रकारात त्याने ही कामगिरी केली. या पदकासोबतच भारताने २०२८ मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी नेमबाजीतील तिसरा कोटा मिळवला आहे.
गुरुवारी (१२ नोव्हेंबर) झालेल्या अंतिम फेरीत विवानने ३० पैकी २९ लक्ष्यांचा अचूक वेध घेतला. कुवेतचा नेमबाज अब्दुलरहमान अलफैहान यानेही २९ गुणांची कमाई केल्याने सुवर्णपदकासाठी दोघांमध्ये शूट-ऑफ घेण्यात आला. या निर्णायक लढतीत विवानला तिसऱ्या प्रयत्नात लक्ष्याचा वेध घेता आला नाही, तर अलफैहानने अचूक नेम साधत सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे विवानला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
या कामगिरीसह विवान जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या ट्रॅप प्रकारात पदक जिंकणारा चौथा भारतीय नेमबाज ठरला आहे. यापूर्वी कर्णी सिंह यांनी १९६२ मध्ये रौप्य, मानवजीत सिंग संधू यांनी २००६ मध्ये सुवर्ण, तर झोरावर सिंग संधू यांनी २०२५ मध्ये कांस्यपदक जिंकले होते.
भारताला तिसरा ऑलिम्पिक कोटा
विवानच्या रौप्यपदकामुळे भारताला लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकसाठी नेमबाजीतील तिसरा कोटा मिळाला आहे. यापूर्वी जयपाल मालवीय याने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात रौप्यपदक जिंकून पहिला, तर नीरज कुमार याने पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात कांस्यपदक मिळवून दुसरा कोटा निश्चित केला होता.
जयपूरचा २४ वर्षीय विवान प्रथमच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळत होता. अनुभवी आंतरराष्ट्रीय नेमबाजांसमोर त्याने दाखवलेली कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली. या यशामुळे भारतीय नेमबाजीला जागतिक स्तरावर आणखी एक मोठे यश मिळाले आहे.
दरम्यान, पुरुषांच्या ट्रॅप सांघिक प्रकारात विवान कपूर, उदयवीर सिंग जैजी आणि झोरावर सिंग संधू यांच्या भारतीय संघाने ३५४ गुण मिळवले. पोलंड आणि झेक प्रजासत्ताक संघांइतकेच गुण मिळूनही टायब्रेकरमध्ये मागे पडल्याने भारताला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper
