मुख्य सामग्री पर जाएँ

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीचे पॅनल निश्चित; मात्र खडसे फॅक्टरचा पेच कायम!

महाजन-गुलाबराव पाटील यांच्यातील तिढा सुटला; रक्षा खडसे यांच्या उमेदवारीवरून मुक्ताईनगरमध्ये राजकीय संघर्षाची शक्यता

वक
विक्रांत कुलकर्णी

2 मिनट पठन

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीचे पॅनल निश्चित; मात्र खडसे फॅक्टरचा पेच कायम!
महाजन-गुलाबराव पाटील यांच्यातील तिढा सुटला; रक्षा खडसे यांच्या उमेदवारीवरून मुक्ताईनगरमध्ये राजकीय संघर्षाची शक्यता

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी महायुतीचे पॅनल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, नेत्यांमधील जागावाटपाचा तिढाही सुटल्याचे संकेत मिळत आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या बैठकीत राजकीय अडचणींवर तोडगा काढण्यात यश आले आहे. मात्र, पॅनलच्या अधिकृत घोषणेपूर्वीच मुक्ताईनगरमधील खडसे फॅक्टर पुन्हा एकदा आडवा येण्याची चिन्हे दिसत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उमेदवारीवरून भाजप आणि शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुती एकत्रितपणे मैदानात उतरणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, मुक्ताईनगर मतदारसंघातील उमेदवारीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. आमदार किशोर पाटील यांचे चिरंजीव सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज यापूर्वी बाद ठरविण्यात आला होता. मात्र, नाशिकच्या सहकार उपनिबंधकांनी गुरुवारी या प्रकरणावर निर्णय देत त्यांचा अर्ज वैध ठरवला. त्यामुळे भाजपच्या राजकीय समीकरणांसमोर पुन्हा अडचण निर्माण झाली आहे.

दरम्यान, मुक्ताईनगरमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे राजकीय वर्चस्व कमी करण्यासाठी पडद्यामागून मंत्री गिरीश महाजन, तर उघडपणे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील आणि भाजपचे आमदार मंगेश चव्हाण प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर देवयानी अनंतराव देशमुख यांचा उमेदवारी अर्ज महत्त्वाचा ठरला आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या निवडणुकीतील मार्गात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.

रक्षा खडसे यांनी महिला राखीव आणि सोसायटी अशा दोन्ही गटांतून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या माध्यमातून त्यांनी दोन्ही गटांतील उमेदवारीचा पर्याय खुला ठेवला आहे. दुसरीकडे, खडसे समर्थक योगेश कोलते यांनी सोसायटी गटातून अर्ज दाखल केला आहे. पॅनलच्या राजकीय समीकरणांनुसार कोलते यांची उमेदवारी महत्त्वाची मानली जात असून, त्यामुळे रक्षा खडसे यांच्यासाठी दोन्ही गटांचे पर्याय उपलब्ध ठेवण्यात आल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

देवयानी देशमुख यांच्या उमेदवारी अर्जावरही आक्षेप घेण्यात आला आहे. त्यांच्यासाठी ठराव असलेली सोसायटी २०२१ मध्येच अवसायनात गेल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. तसेच, त्या संचालक झाल्या त्यावेळी त्यांचे वय १७ वर्षे असल्याचा आक्षेपही घेण्यात आला आहे. या कारणांवरून खडसे समर्थकांनी सहकार उपनिबंधकांकडे याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर काय निर्णय होतो, यावर रक्षा खडसे कोणत्या गटातून निवडणूक लढवणार, हे स्पष्ट होणार आहे.

मुक्ताईनगर गटातून कोणत्याही परिस्थितीत खडसे कुटुंबातील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार, अशी भूमिका खडसे समर्थकांकडून कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे महायुतीच्या पॅनल निर्मितीचा मार्ग मोकळा झाला असला, तरी मुक्ताईनगरमधील उमेदवारीचा पेच कायम आहे. परिणामी, जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकनाथ खडसे विरुद्ध गिरीश महाजन असा राजकीय संघर्ष रंगण्याची चिन्हे असून, महायुतीच्या अंतिम पॅनल घोषणेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

शेयर करें