मुख्य सामग्री पर जाएँ

जमिनीच्या व्यवहारातून डॉक्टरांची निर्घृण हत्या; मृतदेह बहुळा धरणात आढळला

सहा दिवसांपासून होते बेपत्ता; दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात

स्मिता कुलकर्णी
स्मिता कुलकर्णी

1 मिनट पठन

डॉ. संजय तेली
डॉ. संजय तेली

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात जमिनीच्या आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादाचे पर्यवसान डॉक्टरांच्या हत्येत झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोराडखेडा येथील डॉ. संजय तेली यांची हत्या करून त्यांचा मृतदेह पोत्यात भरून बहुळा धरणात फेकण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या डॉ. तेली यांच्या हत्येचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि पाचोरा पोलिसांना यश आले असून, या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

प्राथमिक तपासानुसार, जमिनीच्या आर्थिक व्यवहारावरून डॉ. संजय तेली आणि संशयितांमध्ये वाद झाला होता. या वादातून संशयितांनी त्यांच्यावर वार केले. त्यात डॉ. तेली यांचा मृत्यू झाला. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने संशयितांनी त्यांचा मृतदेह पोत्यात भरून बहुळा धरणात फेकून दिल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, संशयितांनी मृतदेह धरणात फेकल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी काल दुपारपासून बहुळा धरण परिसरात शोधमोहीम सुरू केली. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. मात्र, अंधारामुळे शोधकार्यात अडथळे येत असल्याने मोहीम थांबवण्यात आली. आज सकाळी पुन्हा शोधमोहीम हाती घेण्यात आली.

अखेर पोलिसांच्या शोधमोहिमेदरम्यान डॉ. संजय तेली यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या डॉक्टरांच्या हत्येचा उलगडा झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील दोन संशयितांची चौकशी सुरू असून, हत्येमागील नेमके कारण आणि घटनेचे इतर तपशील शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

शेयर करें
स्मिता कुलकर्णी

रिपोर्टर-सबएडिटर

महाराष्ट्र मिरर